द्वादशीवार की चपळगावकर?; आज ठरणार ९६ व्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक उद्या, मंगळवारी वर्धा येथे होत असून याच बैठकीत ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. ज्येष्ठ लेखक व विचारवंत सुरेश द्वादशीवार यांच्यासह उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व वैचारिक लेखनासाठी प्रसिद्ध असलेले नरेंद्र चपळगावकर यांच्यातून कुठले तरी एक नाव अंतिम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विदर्भ साहित्य संघाचे या वर्षी शताब्दी वर्ष असल्यामुळे ९६ वे संमेलन विदर्भात व्हावे, अशी इच्छा महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने व्यक्त केली होती. त्या संमेलनासाठी त्यांनी वर्धा हे नाव संमेलनस्थळासाठी सुचवले होते. साहित्य महामंडळानेही त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत हे संमेलन वर्धेला दिले.
वर्धा-सेवाग्राम-पवनार ही गांधी-विनोबांची कर्मभूमी आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या संमेलनासाठी गांधीविचारांवर लेखन करणाऱ्या लेखकाची अध्यक्ष म्हणून निवड व्हावी, असा एक मतप्रवाह आहे. त्यातूनच विदर्भ साहित्य संघाकडून सुरेश द्वादशीवारांचे नाव पुढे करण्यात आले. महामंडळाच्या इतर घटक संस्थांचेही द्वादशीवारांच्या नावाला समर्थन असल्याचे कळते. त्यामुळेच उद्याच्या बैठकीत द्वादशीवारांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता साहित्यवर्तुळात व्यक्त केली जात होती; परंतु ऐन वेळी एका घटक संस्थेकडून चपळगावकरांचे नाव पुढे करण्यात आल्याने अध्यक्षपदासाठीची स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, चपळगावकरांनीही आपल्या नावाचा प्रस्ताव मांडण्यास परवानगी दिल्याचे कळते. चपळगावकर व द्वादशीवारांसोबतच काही घटक संस्थांनी कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ समाजसवेक डॉ. अभय बंग यांचीही नावे सुचवली आहेत.
स्वागताध्यक्षपदी दत्ता मेघे..
या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी खासदार दत्ता मेघे यांची निवड करण्यात आली. संमेलनाच्या संरक्षकपदाची जबाबदारी माजी आमदार सागर मेघे यांनी स्वीकारली. विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सरचिटणीस विलास मानेकर आणि कोषाध्यक्ष विकास लिमये यांनी मेघे त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले
एकमत न झाल्यास मतदानाद्वारे कौल ..
उद्या वर्धेत होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीच्या पहिल्या सत्रात कार्यक्रम पत्रिकेचे स्वरूप अंतिम केले जाणार आहे. बैठकीच्या दुसऱ्या सत्रात अध्यक्षाच्या नावावर चर्चा होईल. महामंडळासह सर्व घटक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी असलेल्या या बैठकीत अध्यक्षाचे नाव एकमताने ठरू शकले नाही तर मग मात्र मतदानाद्वारे कौल घेण्यात येईल. ज्याच्या बाजूने जास्त मते पडतील त्याची अध्यक्षपदी निवड होईल. साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे या पत्रकार परिषद घेऊन वर्धेतच या नावाची घोषणा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.