कापसाने भरलेला ट्रक भररस्त्यात खाक
![Dust the truck full of cotton](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/magpar-1.jpg)
कर्जत |
अहमदनगर सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू गावाजवळ नागरिकांनी ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार अनुभवला. कापसाने भरलेला ट्रक भर दुपारी अचानक पेट घेतो कोणाला काही समजण्याच्या आत आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडतात. संपूर्ण महामार्ग तब्बल एक तास थांबतो… प्रत्येक जण ते भयानक दृश्य डोळ्याने पाहत असतो. सर्वत्र आरडाओरड सुरू होतो, ‘पाणी आणा पाणी टाका आग विझवा.’ सर्वांसमक्ष भडकलेल्या आगीमध्ये तो ट्रक जळून खाक होतो. ट्रक चालक व क्लीनर सुदैवाने वाचतात.
या बाबत घडलेली घटना अशी की, अहमदनगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील निमगाव डाकु गावाजवळ कापसाने भरलेला ट्रक (टी एन -२८ येवाय -१५९६) रस्त्याने जात असताना अचानक आग लागली. हे ट्रक चालक आणि क्लीनर यांच्या लक्षात आल्याने, त्यांनी ट्रकमधून उड्या मारल्या. कोणाला काही समजण्यापूर्वीच त्या ट्रकने प्रचंड पेट घेतल्यामुळे आगीच्या ज्वाळा भडकू लागल्या. भर रस्त्यावर ट्रक पेटल्यामुळे महामार्गावरील सर्व वाहतूक देखील बंद झाली होती. नागरिकांची काही क्षणात या ठिकाणी गर्दी झाली. काही जणांनी पाणी आणण्यासाठी धावपळ सुरू झाली. मिळेल त्या वाहनांमधून पाणी आणून ट्रक विझवण्याचा प्रयत्न झाला.
- सतरा लाख रुपयांचे नुकसान
या ट्रकमध्ये १५.५ मेट्रिक टन कापूस होता. या कापसाची किंमत सात लाख ७५ रुपये होती तर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला दहा टायर ट्रक याची किंमत दहा लाख रुपये होती. अशा पद्धतीने १७ लाख रुपयांचे या ठिकाणी नुकसान झाले आहे
- महामार्ग एक तास ठप्प
नगर-सोलापूर महामार्गावर अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आहे. अवजड कंटेनर सह अनेक वाहने या रस्त्याने धावतात. भर रस्त्यावर ट्रक पेटल्यामुळे सुमारे एक तास हा महामार्ग बंद होता. यामुळे दुतर्फा गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. आग आटोक्यात आल्यानंतर एका बाजूने वाहतूक पोलीस विभागाने सुरू केली.
- कर्जत येथील अग्निशामक दल घटनास्थळी
या घटनेची माहिती नगरपंचायत देण्यात आल्यानंतर कर्जत नगरपंचायतचा अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचला. त्यांनी तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आग इतकी मोठी होती की बंबातील पाणी संपले तरी आग आटोक्यात आली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी त्या ठिकाणी कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस जवान विठ्ठल दहिफळे, वैभव सुपेकर, गोरख जाधव, बेग पाठवले त्यांनी परिसरातील नागरिक व कर्जत नगरपंचायत चा अग्निशामक बंब यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली आणि ठप्प झालेली वाहतूक सुरू केली.
वाचा- “सर्वच परीक्षा पुढे ढकला”, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी