राज्यातील कनिष्ठ पोलीस अधिकारी नाराज; रखडलेल्या बदल्यांसाठी ‘अर्थपूर्ण’ हालचाली?
![Disgruntled junior police officers in the state; 'Meaningful' moves for stalled transfers?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Police-1-780x470.jpg)
नागपूर : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या झाल्याने राज्यातील मोठा पेच सुटला. मात्र, अद्यापही कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या खोळंबलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा कणा असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून एकमत होत नव्हते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांच्या बदल्या रखडल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘अर्थपूर्ण’ हालचाली करताच राज्यातील जवळपास १४० ते १५० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, पुन्हा ‘व्हिटॅमिन एम’मुळे राज्यातील अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्याची चर्चा आहे.
पोलीस विभागात असलेली खदखद आणि नियुक्तीला होत असलेला उशीर यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यातील वाद पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक महत्त्वाचा घटक आहे. मात्र, सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या बदल्या रखडल्यामुळे राज्यभरातील पोलीस अधिकारी नाराज आहेत.
गृहमंत्र्यांच्या परवानगीची अट..
अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कनिष्ठ पोलीस अधिकारी आपली खदखद व्यक्त करीत आहेत. राज्यातील पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची बदली करण्याचा अधिकार पोलीस महासंचालकांना आहे. मात्र, त्यासाठीसुद्धा महासंचालकांना गृहमंत्र्यांची वारंवार परवानगी घ्यावी लागत असल्याने कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय रखडल्याची माहिती आहे.
‘मॅट’मध्ये जाण्याची मोकळीक
पोलीस अधिकाऱ्यांचा सेवा कालावधी पूर्ण झाला असेल आणि त्यांची बदली झाली नसेल तर, त्यांना महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) मध्ये जाण्याचा अधिकार आहे. जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्यास मॅटमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. पोलीस महासंचालक कार्यालयातही विनंती बदलीचे अर्ज गठ्ठय़ात गुंडाळून ठेवण्यात येतात. परंतु, आता अनेक जण मॅटमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
विनंती बदल्यांकडे लक्ष..
एखाद्या जिल्ह्यात किंवा आयुक्तालयात ३ वर्षांचा सेवेचा कालावधी पूर्ण केल्यास अशा अधिकाऱ्यांना विनंती बदलीसाठी अर्ज करता येतो. त्यामध्ये पती-पत्नी एकत्रीकरण, आई-वडिलांचा गंभीर आजार, लहान मुलाचे संगोपण, मुलीचे लग्न अशा अटी आहेत. परंतु, काही अधिकाऱ्यांच्या विनंती बदलीचे कारण गंभीर स्वरूपाचे असते. तरीही बदली होत नसल्याने अधिकारी नैराश्यात आहेत.