Dilli Voilance: नाल्यात सापडले आणखी तीन मृतदेह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/nale-delhi_.jpg)
नवी दिल्ली | महाईन्यूज
दिल्लीतील हिंसाचार थांबलेला दिसत आहे, परंतु अद्याप परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाली नाही. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात अद्यापही सापडत असलेल्या मृतदेहामुळे लोक संतापले आहेत. रविवारी गोकुळपुरी भागात नाल्यातून १ आणि भागीरथी बिहारमधून दोन असे आणखी तीन मृतदेह सापडले. अशा प्रकारे आता या हिंसाचारात मृतांचा आकडा ४५ वर गेला आहे. दिल्लीतील हिंसाचारानंतर मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे.
आज सकाळी ११ वाजता पहिला एक मृतदेह सापडला, त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना दुपारपर्यंत एकूण तीन मृतदेह आढळून आले. गोकुळपुरी नाल्यातून एक आणि भागीरथी नाल्यातून दोन मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले. दुर्गंधी आल्यानंतर लोकांनी पोलिसांना कळविले, त्यानंतर शोध मोहीम राबवून पोलिसांनी तीन मृतदेह ताब्यात घेतले आहेत. हिंसाचारातील मृतांचा आकडा आता 45 वर आला आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला आहे.सध्या मृतदेहांची ओळख पटलेली नाही. पोलीस प्रशासन मृतदेहांची ओळख पटवित आहे. यापूर्वी विविध भागातील या नाल्यातून तीन मृतदेह सापडले आहेत. या नाल्यातून चांद बाग परिसरातून आयबी कॉन्स्टेबल अंकितचा मृतदेहही मिळाला. ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर, बाबरपूर, चांदबाग, शिव विहार, भजनपुरा, यमुना विहारमध्ये हिंसाचारामुळे 42 जणांचा मृत्यू आणि 200 हून अधिक जखमी झाले. मोठ्या प्रमाणात मालमत्तांचे नुकसान झाले आहे. दरोडेखोरांच्या जमावाने घरे, दुकाने, वाहने आणि पेट्रोल पंप पेटवून स्थानिक आणि पोलिसांवर दगडफेक केली आहे.