राज्यात कोरोनामुक्त होण्याचा पहिला मान मिळाला धुळे जिल्ह्याला
![The third wave in October, a warning of danger for young children](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/corona-1-4.jpg)
धुळे – राज्यातील कोरोनाची परिस्थिती झपाट्याने नियंत्रणात येत असून योग्य नियोजन व सूचनांचे पालन केल्यामुळे या दुसऱ्या लाटेत राज्यात संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त करण्याचा मान धुळे जिल्ह्याला मिळाला आहे. धुळे जिल्ह्यात रविवारी सायंकाळपर्यंत अवघे दोन कोरोनाग्रस्त रुग्ण रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र काल सोमवारी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आणि हा जिल्हा कोरोनामुक्त झाला असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
धुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार ८४३ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी ६६८ जणांचा उपचार घेत असताना दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या हा जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी धुळेकरांनी मात्र या यशाने हुरळून न जाता आगामी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर त्रिसूत्री नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात कोरोनामुक्त होण्याचा पहिला मान खरे तर भंडारा जिल्ह्याला ६ ऑगस्ट रोजीच मिळाला होता. मात्र रविवारी ९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात पुन्हा एक कोरोना रुग्ण आढळला आणि हा मान भंडारा जिल्ह्याकडून धुळे जिल्ह्याच्या नावावर नोंदला गेला आहे.