Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे; उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई-गोवा महामार्गाची उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी राज्यस्तरीय समिती

मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावीत

भुयारी मार्गानजीक असलेल्या रस्त्यांसाठी २१ कोटींची तरतूद

मुंबई | मुंबई-गोवा महामार्गाची कामे गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर तातडीने पूर्ण करावीत. महामार्गावरील इंदापूर – माणगाव नजीकच्या रस्त्यासाठी लागणाऱ्या २१ कोटींचा निधी उपलब्ध करणार असून, ही कामे तातडीने पूर्ण करावीत. मुंबई-गोवा महामार्गावरील अपुरी कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती नेमून कामे मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मंत्रालयात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाविषयी आयोजित बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, नियोजन विभागाचे सचिव डॉ.राजगोपाल देवरा यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई-गोवा महामार्गाची अपुरी राहिलेली कामे पूर्ण होण्यासाठी राज्यस्तरीय समिती नेमून मुंबई-गोवा महामार्गाची चौपदीकरणाची कामे, रस्त्यातील खड्ढे भरणे,विविध ठिकाणी माहितीपूर्ण दिशादर्शक फलक लावणे,पूलांची कामे, महामार्गावर ट्रामा केअर सेंटर उभारणे, दर चाळीस किलोमीटर अंतरावर शौचालयांची व्यवस्था यासह इतर सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे.

हेही वाचा     :    मोशीतील सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा वर्षाव    

विभागाने रस्त्यातील धोकादायक असलेले खड्डे तत्काळ भरुन घेण्यासाठी विशेष दोन अधिकारी यांची नियुक्ती करावी. नागरिकांना या अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून आलेल्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करावी.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, गणेशोत्सव कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणात कोकणवासीय आपल्या गावी जातात. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने मोठी बांधकामाची कामे ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतील अशी थांबवावीत. जिथे जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे अशी ठिकाणे रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग प्रशासनाने पाहणी करून तिथे वाहतूकीचे काटेकोरपणे नियोजन करावे. अवजड वाहने तसेच इतर वाहतुकीचे नियोजन करावे. घाट रस्ते तसेच वळणाच्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी. वैद्यकीय सोयी सुविधा यांची देखील स्थानिक प्रशासनाने सोय करावी.

यावेळी या बैठकीला दूरदृश्य संवाद प्रणालीव्दारे कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस अधीक्षक वाहतूक राष्ट्रीय महामार्ग तानाजी चिखले, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गचे मुख्य अभियंता प्रशांत फेगडे, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रादेशिक अधिकारी अंशुमली श्रीवास्तव, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता कोकण भवन संतोष शेलार, राष्ट्रीय महामार्ग मंडळाचे अधीक्षक अभियंता तृप्ती नाग, रायगडच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, जनआक्रोश समितीचे अध्यक्ष अजय यादवराव, बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोक वालम, प्रकाश भांगरथ यावेळी उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button