नोएडातील दोन ४० मजली टॉवर्स पाडा! सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
![Demolish two 40 storey towers in Noida! Supreme Court order](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/WhatsApp-Image-2021-08-31-at-13.13.43.jpeg)
नवी दिल्ली – सुपरटेक समूहाने नियमांचे उल्लंघन करून नोएडात बांधलेले जुळे ४० मजली टॉवर २ महिन्यांत बिल्डरने स्वःखर्चाने पाडावेत, असा आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या टॉवर्समध्ये १,००० फ्लॅट आहेत. या बिल्डरने हे बांधकाम करताना नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
सुपरटेकने ४० मजल्यांचे दोन टॉवर्स बांधले आहेत. ते बांधताना त्यांनी अनेक नियमांचे उल्लंघन केले. त्याला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर उच्च न्यायालयाने हे टॉवर्स पाडण्याचे आदेश ११ एप्रिल २०१४ रोजी दिले होते. त्याला आव्हान देणारी याचिका सुपरटेकणे सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज निर्णय देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत हे टॉवर दोन महिन्यात पाडण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. त्याचा सर्व खर्च बिल्डरला करावा लागणार आहे. याशिवाय या टॉवरमध्ये ज्यांनी घरे बुक केली होती, त्यांचे पैसे परत करण्याचाही आदेश न्यायालयाने दिले आहेत.