भाजपच्या विजयानंतर दिल्लीकरांना होणार फायदा; काय-काय मिळणार मोफत?
Delhi Election 2025 : माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत जबरदस्त हार पत्करावी लागली. स्वतः केजरीवाल यांचा पराभव झाल्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड निराशा दिसून येत आहे. तर तब्बल 27 वर्षानंतर भाजपला राजधानी दिल्लीत मिळालेले घवघवीत यश हे त्या पक्षाच्या जल्लोषाचे कारण ठरले आहे.
सर्वसामान्यांना दिल्लीत भाजपाच्या विजयामुळे मोठ्या अपेक्षा आहेत. खरं तर, विधानसभा निवडणुकीच्या वेळी केवळ आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसच नव्हे तर भाजपानेही लोकांसाठी मोठी आश्वासने दिली. भाजपाने आता निवडणूक जिंकली असल्याने अशा परिस्थितीत, भाजपाने आपल्या ठराव पत्रात नमूद केलेल्या आश्वासनांकडे सर्वप्रथम लोक पाहतील.
भाजपाने आपले ठराव पत्र तीन टप्प्यात जारी केले होते आणि अनेक घोषणा केल्या आहेत, ज्यात दरमहा गरीब महिलांना स्वस्त गॅस सिलिंडर देण्याची घोषणा आणि आयुषमान भारत योजनेची अंमलबजावणी करण्याची अनेक आश्वासने दिली होती.
‘आप’ने पहिल्यांदाच सत्तेत आल्यानंतर मोफत वीज-पाणी मॉडेल सादर केले होते. तसेच सरकारी शाळा आणि रुग्णालयांच्या स्थितीत सुधारणा झाल्याचा दावा केला. या सुधारणा काही प्रमाणात झाल्या आहेत. या मॉडेलमुळे दोनदा सरकार स्थापन झाले, पण त्यानंतर प्रत्येक अपयशासाठी इतरांना दोष देण्याची प्रवृत्ती सुरू झाली. दिल्लीत केजरीवाल यांना टक्कर देण्यासाठी भाजपानेही मोठी आश्वासने दिली, ज्यात स्त्रियांपासून वृद्धांपर्यंत फायदेशीर अशा सुविधा करण्यात येणार आहे. भाजपच्या या आश्वासनानुसार आता दिल्लीकरांना काय-काय मोफत मिळणार ते पाहुयात…
हेही वाचा – To The Point : डेप्युटी सीएम अजित पवार साहब को गुस्सा क्युँ आता है?
– महिलांसाठी मोफत बसप्रवास.
-दिल्लीतील महिलांना दरमहा 2500 रुपये.
– गर्भवती महिलांना 21 हजार रुपये व सहा पोषण किट मिळणार.
-झोपडपट्ट्यांमध्ये अटल कॅण्टीनमध्ये 5 रुपयांत पोटभर जेवण मिळणार.
-गरीब कुटुंबांना एलपीजी सिलिंडरवर 500 रुपयांचे अनुदान दिले जाणार.
-होळी आणि दिवाळीला एक सिलिंडर मोफत.
-दिल्लीत आयुष्मान योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार.
-स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी दिल्लीतील तरुणांना 15 हजार आर्थिक मदत.
-तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना दरमहा एक हजार रुपयांची मदत.
-विद्यार्थ्यांना दिल्ली मेट्रोमध्ये दरवर्षी चार हजार रुपयांपर्यंत मोफत प्रवास दिला जाणार.
-दिल्लीतील सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये गरजू विद्यार्थ्यांन ‘केजी’ ते ‘पीजी’ पर्यंत मोफत शिक्षण.
-200 युनिट मोफत वीज आणि 20 हजार लिटर मोफत पाण्याची सुविधा.
-60 ते 70 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शनची रक्कम दोन हजारवरून अडीच हजार रुपये करणार.
-70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि अपंगांना पेन्शन अडीच हजारवरून तीन हजार रुपये करणार.
-दिल्लीतील गिग कामगारांसाठी 10 लाख रुपयांचा जीवन विमा आणि पाच लाख रुपयांचा अपघात विमा.
-रिक्षाचालकांसाठी 10 लाख रुपयांचा जीवन विमा आणि पाच लाखांचा अपघाती विमा दिला जाणार.
दरम्यान, दिल्लीतील पक्षाच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयात उपस्थित कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिल्लीच्या जनतेने आप-दाला हद्दपार केले आहे. दिल्ली दशकभरातील ‘आप’पासून मुक्त झाली आहे. दिल्लीचा जनादेश स्पष्ट आहे. दिल्लीत विकास, दृष्टी आणि विश्वास यांचा विजय झाला आहे. या निकालामुळे भाजप कार्यकर्त्यांची रात्रंदिवस मेहनत फळाला आली आहे. तुम्ही सर्व कार्यकर्ते या विजयाचे हकदार आहात. या विजयाबद्दल मी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे खूप खूप अभिनंदन करतो.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आजच्या निकालाची दुसरी बाजू आहे. आपली दिल्ली फक्त एक शहर नाही, ही दिल्ली मिनी हिंदुस्थान आहे, हा लघु भारत आहे. वन इंडिया-बेस्ट इंडियाची कल्पना दिल्ली जगते. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आम्ही पहिल्यांदा हरियाणात अभूतपूर्व विक्रम केला. त्यानंतर महाराष्ट्रात नवा विक्रम झाला. आता दिल्लीत नवा इतिहास रचला आहे. आज दिल्लीतील असा एकही भाग किंवा विभाग नाही जिथे कमळ फुलले नाही. दिल्लीत भाजपच्या कमळ चिन्हावर प्रत्येक भाषा बोलणाऱ्या आणि प्रत्येक राज्यातील लोकांनी मतदान केले आहे.”
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा