Delhi Violence : ‘त्या’ जवानाचे जाळलेले घर बांधून देण्यासाठी BSF चा पुढाकार…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-246.png)
उत्तर-पूर्व दिल्लीत उफाळलेल्या हिंसाचारात बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या एका जवानाचे घर जाळण्यात आले. या जवानाला मदत करण्यासाठी बीएसएफने आता पुढाकार घेतला आहे. उत्तर-पूर्व दिल्लीतील खास खजुरी गली परिसरात मोहम्मद अनिस या जवानाचे घर होते. हिंसक झालेल्या जमावाने हे घर पेटवून दिले. या घटनेबद्दल जवानाने त्याच्या वरिष्ठांना लगेच कळवले नाही.
बीएसएफच्या अधिकाऱ्यांना बातम्यांमधून, दिल्लीतील हिंसाचारात जवानाचे घर जाळण्यात आल्याची माहिती मिळाली.तेव्हा मदतीसाठी बीएसएफकडून मोहम्मद अनिसच्या वडिलांशी संपर्क साधण्यात आला. जमावाने हल्ला केला त्यावेळी जवानाचे वडिल, काका आणि चुलत बहिण घरामध्ये होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Capture-78.png)
सुदैवाने ते घरामधून निसटण्यात यशस्वी ठरले. नातेवाईकांच्या घरी त्यांनी आश्रय घेतला आहे. आम्ही बीएसएफ जवानाच्या कुटुंबाला आर्थिक आणि घर बांधून देण्यासाठी मदत करणार आहोत. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी इंजिनिअरींग विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आहे असे बीएसएफचे डायरेक्टर जनरल विवेक जोहरी यांनी सांगितले.
बीएसएफकडून खासगी कॉन्ट्रॅक्टरला घर बांधणीचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येईल. बीएसएफच्या वेल्फेअर फंडातून मोहम्मद अनिसला सोमवारी पाच लाख रुपयांचा चेक देण्यात येणार आहे. मोहम्मद अनिसचे पुढच्या तीन महिन्यात लग्न आहे. आमच्याकडून ही त्याला लग्नाची भेट आहे असे विवेक जोहरी यांनी सांगितले.