पेट्रोल दरवाढीवर दिल्ली सरकारचा रामबाण उपाय; किमती थेट ८ रुपयांनी आल्या खाली!
![पेट्रोल दरवाढीवर दिल्ली सरकारचा रामबाण उपाय; किमती थेट ८ रुपयांनी आल्या खाली!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/dilli.jpg)
नवी दिल्ली |
एकीकडे देशभरात पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलं असताना राजधानी दिल्लीमध्ये मात्र आज पेट्रोलच्या किमती थेट ८ रुपये प्रतिलिटर इतक्या कमी झाल्या. त्यामुळे देशभरातील नागरिकांना जरी पेट्रोलच्या शंभरीपार गेलेल्या दरांचा फटका सहन करावा लागत असला, तरी दिल्लीकर मात्र दिल्ली सरकारच्या एका निर्णयामुळे खूश झाले आहेत. त्यामुळे आता इतर राज्यातील जनता देखील त्या त्या राज्य सरकारने अशाच प्रकारचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करू लागली आहे.
- कसे बदलले दिल्लीतले पेट्रोलचे दर?
राजधानी दिल्लीमध्ये सध्या पेट्रोल १०३.९७ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ८६.६७ रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकले जात आहे. तर मुंबईत हेच दर अनुक्रमे १०९.९८ रुपये आणि ९४.१४ रुपये प्रतिलिटर इतके आहेत. या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून दिल्लीमध्ये पेट्रोल ८ रुपयांनी स्वस्त म्हणजेच ९५.९७ रुपये प्रतिलिटल या दराने मिळणार आहे. त्यामळे देशभर दिल्ली सरकारच्या निर्णयाची चर्चा सुरू झाली आहे.
- दिल्ली सरकारने असं काय केलं?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. दिल्ली सरकारकडून आत्तापर्यंत पेट्रोलवर तब्बल ३० टक्के व्हॅट अर्थात व्हॅल्यु अॅडेड टॅक्स आकारला जात होता. तो व्हॅट आता दिल्ली सरकारने थेट १९.४० टक्क्यांवर खाली आणला आहे. अर्थात, या व्हॅटमध्ये तब्बल १०.६० टक्क्यांनी घट करण्यात आली आहे. त्याचा परिणाम म्हणून, दिल्लीमध्ये आता पेट्रोल ८ रुपयांनी स्वस्त झालं आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात ४ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी अनुक्रमे ४ रुपये आणि ८ रुपये प्रतिलिटर इतकी कमी केली होती. त्यामुळे काही प्रमाणात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर झाल्या होत्या.
- तेल उत्पादन क्षेत्रावरही ओमायक्रॉनचं सावट?
मोठ्या शहरांचा विचार करता देशात सर्वाधिक इंधन दर मुंबईत आहेत. जागतिक स्तरावर विचार करता कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे ओमायक्रोन व्हेरिएंटमुळे इंधनाच्या मागणीवर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता असताना या संकटाचा सामना कसा करायचा, यावरही जागतिक स्तरावरील तेल उत्पादक चर्चा करत आहेत.