इराणचे अध्यक्ष रईसी यांचा मृत्यू; भारतात राष्ट्रीय दुखवटा जाहीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/www.mahaenews.com-2-4-780x470.jpg)
नवी दिल्ली : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी, देशाचे परराष्ट्र मंत्री आणि अन्य काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा काल झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. इराणच्या वायव्येकडील पर्वतीय भागात धुक्यामध्ये त्यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याची बातमी काल समोर आली होती.मात्र या अपघाताचे तपशील आज समोर आले आहेत. हेलिकॉप्टरमधील सर्वजण घटनास्थळी मृतावस्थेत आढळले आहेत. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने रईसी यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनी यांनी रईसी यांच्या जागेवर देशाचे प्रथम उपाध्यक्ष मोहम्मद मोखबर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. निवडणुका होईपर्यंत ते देशाचे अध्यक्ष असणार आहेत.रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात अझरबैजानच्या पूर्वेकडील प्रांतात झाला होता. ते एका धरणाच्या उद्घाटनासाठी तेथे गेले होते. परतत असताना हा अपघात झाला. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त होण्याचे नेमके कारण वृत्तसंस्थेकडून देण्यात आलेले नाही.
हेही वाचा – AAP ला अमेरिका, कॅनडा, अरब देशातून मिळाली कोट्यवधीची माया, ED चा गृहमंत्रालयाला धक्कादायक अहवाल
मृतांमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमिराब्दुल्लाह, इराणमधील पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर, त्यांचे सरुक्षा रक्षक आणि अन्य अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.अझरबैजान-इराण सीमेपासून २० किलोमीटरवरील घटनास्थळाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आल्यावर पेटलेले हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलेले आढळल्याचे तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या ठिकाणी नंतर हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले असून कोणीही जीवित सापडले नाही.
अध्यक्षपदावर असताना मृत्यू झालेले रईसी हे इराणचे दुसरे अध्यक्ष आहेत. यापूर्वी १९८१ साली एका बॉम्बस्फोटात तत्कालिन अध्यक्ष मोहम्मद अली रजाई यांचा देखील अकाली मृत्यू झाला होता.दरम्यान, रईसी यांच्या निधनावर भारत सरकारने देखील २१ मे रोजी देशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की,
मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ, भारत सरकारने २१ मे रोजी संपूर्ण भारतामध्ये एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी भारतातील सर्व इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. या दिवशी कोणतेही अधिकृत कार्यक्रम होणार नाहीत.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. ते म्हणाले, “इराणचे इस्लामिक प्रजासत्ताक राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रायसी यांच्या दुःखद निधनाने अत्यंत दु:ख आणि धक्का बसला आहे.
भारत-इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे कुटुंब आणि इराणच्या लोकांप्रती माझ्या संवेदना. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे. असं ते म्हणाले.