#CoronoVirus:रॅपिड अँटिबॉडी चाचण्यांवर केंद्र सरकारने निर्णय घ्यावा : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
![Supreme Court refuses to mediate in Delhi violence case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/supreme-court-lp.jpg)
नागपूर. कोरोना रुग्णांच्या शोधासाठी केंद्र सरकारने रॅपिड अँटिबॉडी चाचण्या सुरू करण्याच्या शिफारशीवर निर्णय घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला दिले. नागपुरातील सुप्रसिद्ध फुप्फुसरोग तज्ञ डॉ. राजेश स्वर्णकार यांच्या याचिकेवर न्यायालयाने हे निर्देश दिले.
इंडियन काैन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने सरकारला कोरोना महामारीसाठी ‘स्क्रीनिंग टूल’ म्हणून रॅपिड अँटिबॉडी चाचण्या सुरू करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार सरकारला निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी न्या. एन.व्ही. रामन्ना, न्या. एस. के. कौल आणि न्या. भूषण गवई यांच्या पीठाने सरकारला निर्देश दिले.
संशयितांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची गरज नाही…
देशात कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी संस्थात्मक विलगीकरण कक्ष अथवा आयसोलेशन वॉर्ड उभारण्याची गरज नाही. तो खर्च अनावश्यक आहे. संशयित रुग्णांना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवून अनावश्यक खर्च वाचवता येईल, असा दावा याचिकाकर्ते डॉ. स्वर्णकार यांनी केला आहे.