#CoronaVirus: मदतीच्या आशेवर असलेल्या पाकिस्तानला अमेरिका देणार ८४ लाख डॉलर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Imran-Khan.jpg)
करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी आर्थिक दृष्टया सक्षम नसलेल्या पाकिस्तानला अमेरिकेने ८४ लाख अमेरिकन डॉलरची मदत जाहीर केली आहे. पाकिस्तानातील अमेरिकेचे राजदूत पॉल जोन्स यांनी शुक्रवारी या मदतीची घोषणा केली.
करोनाचा व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी तसेच करोनाची बाधा झालेल्यांवर उपचारांसाठी पाकिस्तानला आर्थिक मदत देणार असल्याचे पॉल जोन्स यांनी व्हिडीओ संदेशात म्हटले आहे. पाकिस्तानातील करोना व्हायरसचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये तीन नवीन मोबाइल प्रयोगशाळा सुरु करण्यासाठी ३० लाख अमेरिकन डॉलर्सचा वापर करण्यात येईल असे डॉन न्यूजने म्हटले आहे.
लोकांच्या घरोघरी जाऊन करोना चाचण्या करण्यासाठी आरोग्य सेवकांना प्रशिक्षित करण्यात येईल. त्यासाठी या निधीचा वापर करण्यात येईल. पाकिस्तानात ७४७६ जणांना करोनाची लागण झाली असून १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तिथे करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आणखी वाढू शकतो.