#CoronaVirus: भारताला ५९ लाख डॉलरची मदत
अमेरिकेने कोविड १९ म्हणजे करोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारताला ५९ लाख डॉलर्सची आरोग्य मदत मंजूर केली आहे.
या मदतीचा वापर करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केला जाणार असून नवीन रुग्ण शोधणे, आरोग्य जागरूकता संदेशांचा प्रसार करणे, रुग्णांवर देखरेख वाढवणे या कामांसाठी निधी वापरणे अपेक्षित असल्याचे परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.
करोना विषाणूच्या साथीला तोंड देण्यासाठी तातडीच्या आर्थिक तरतुदीसाठी हा निधी वापरता येणार आहे. भारताला वीस वर्षांत अमेरिकेने दिलेल्या २.८ अब्ज डॉलर्सच्या एकूण मदतीत १.४ अब्ज डॉलर्स ही निव्वळ आरोग्य मदत आहे. परराष्ट्र खाते, अमेरिकेची आर्थिक विकास संस्था यांनी ५०८ दशलक्ष डॉलर्सची मदत देण्याचे मान्य केले आहे. बहुदेशीय मदतीशिवाय भारताला मिळणारी ही मदत वेगळी आहे. दक्षिण आशियात अफगाणिस्तान १८ दशलक्ष डॉलर्स, बांगलादेश ९६ लाख डॉलर्स, भूतान पाच लाख डॉलर्स, नेपाळ ८ लाख डॉलर्स, पाकिस्तान ९४ लाख डॉलर्स, श्रीलंका १३ लाख डॉलर्स या प्रमाणे मदत देण्यात आली आहे.