Corona Virus : दिल्लीतील लोहिया रुग्णालयात तीन जण देखरेखीखाली
चीनमध्ये प्रवास करून आलेल्या तीन व्यक्तींना येथील राममनोहर लोहिया रुग्णालयात स्वतंत्र कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय आहे. ज्यांना देखरेखीखाली ठेवले आहे ते २४ ते ४८ वयोगटातील पुरुष आहेत. त्यांना सोमवारी दाखल करण्यात आले असून त्यांचे नमुने आयसीएमआर- एनआयव्ही पुणे येथे पाठवण्यात आले आहेत, असे राममनोहर लोहिया रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीनाक्षी भारद्वाज यांनी सांगितले आहे.
यातील दोन जण हे दिल्लीचे असून एक राजधानी क्षेत्र विभागातील रहिवासी आहे. सर्व तीनही रुग्णांना सर्दी कफ झाला असून त्यांना श्वास घेण्यास अडथळा येत आहे. सर्व तीनही रुग्ण स्वत:हून दाखल झाले असून त्यांना ताप आलेला आहे. आठवडाभरापूर्वी यातील दोन जण चीनला जाऊन आले असून त्यातील एक जण महिनाभरापूर्वी चीनला गेलेला होता. सोमवापर्यंत ३३,५५२ लोकांची चीनहून भारतात आल्यानंतर विमानतळावरच तपासणी करण्यात आली. १४ जानेवारीपर्यंतच्या माहितीनुसार आयसीएमआर एनआयव्ही पुणे येथे एकूण १७ नमुने मिळाले होते. त्यातील १४ नमुन्यांची तपासणी झाली असून त्यात विषाणूचा परिणाम आढळून आला नाही.