वुहानमधूनच करोनाचा फैलाव? प्रयोगशाळेतील तीन संशोधक पडले होते आजारी; रिपोर्टमधून खुलासा
![Corona spread from Wuhan? Three researchers in the lab had fallen ill; Disclosure from the report](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Corona-Wuhan.jpg)
नवी दिल्ली |
करोना महामारीने गेल्या दीड वर्षांपासून जगभरात थैमान घातला असून त्याची सुरुवात नेमकी कुठून झाली याबाबत अद्यापही वाद सुरु आहे. चीनमधूनच करोनाचा फैलाव झाल्याचा अनेक देशांचा आरोप असून चीन मात्र हा आरोप फेटाळण्यात आलं आहे. यादरम्यान आता एक नवी माहिती समोर आली आहे, ज्यानुसार वुहानच्या ज्या प्रयोगशाळेतून करोनाचा फैलाव झाल्याचा दावा केला जात आहे तेथील तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी जगाला करोना संसर्गाची कोणतीही कल्पना नव्हती. वॉल स्ट्रीट जर्नलमधील रिपोर्टच्या आधारे रॉयटर्सने हे वृत्त दिलं आहे. वॉल स्ट्रीट जर्नललच्या रिपोर्टनुसार, चीनने जगासमोर करोनाची माहिती जाहीर करण्याआधी नोव्हेंबर २०१९ मध्ये वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या (WIV) तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
रिपोर्टनुसार तिन्ही कर्मचाऱ्यांमध्ये करोनासारखी लक्षणं होती. यामध्ये अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या रिपोर्टचा उल्लेख करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०१९ नंतरच डिसेंबर-जानेवारीदरम्यान जगाला करोना महामारीची माहिती मिळाली होती. वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्टमध्ये नेमक्या किती संशोधकांना लागण झाली, त्याची वेळ, त्यांच्या रुग्णालयातील कालावधी यांची माहिती देण्यात आली असून यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या तपासात मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. करोनाचा फैलाव नेमका कुठून झाला यासंबंधी जागतिक आरोग्य संघटना तपास करत आहे. यासाठी त्यांचं एक पथक वुहानमध्येही गेलं होतं. जागतिक आरोग्य संघटना तपासातील पुढचा टप्पा निश्चित करत असतानाच ही माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र बायडन प्रशासन अद्यापही करोनाच्या पहिल्या दिवसांच्या बाबतीत चिंतीत असून अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचं सांगितलं आहे. यामध्ये चीनमधून करोनाचा फैलाव झाल्याचाही उल्लेख आहे. वॉशिंग्टनमधील चिनी दुतावासाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रविवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या पथकाने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या दौऱ्यात वुहानमधील प्रयोगशाळेतून संसर्ग झाल्याची शक्यता नाकारली होती याकडे लक्ष वेधलं होतं. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टवर प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिका अद्यापही लॅब लिक थिअरीचा प्रचार करत असल्याचं म्हटलं आहे. “खरंच कुठून फैलाव झाला याची माहिती मिळवली जात आहे की लक्ष हटवलं जात आहे,” अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
वाचा-भारतात आढळलेल्या विषाणू उत्परिवर्तनाबाबत अॅस्ट्राझेनेकाची लस प्रभावी