१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना आता ऑनलाईन रजिस्ट्रेशनशिवाय मिळणार लस
![Municipality did not get Covishield vaccine! Only a dose of covacin will be available on Saturday](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/914328-corona-vaccine-2.jpg)
नवी दिल्ली – देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्याकरता लसीकरणाला वेग देणं गरजेचं आहे. मात्र, लसींचा तुटवडा आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनमुळे लसीकरणाला ब्रेक लागला आहे. परंतु आता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशनशिवाय लसीकरण केंद्रावर लस देण्यात येणार आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 44 या वयोगटातील नागरिक नोंदणीशिवाय थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकतात. तेथे पोचल्यानंतर त्यांची नोंदणी कोविन ॲपवर cowin.gov.in केली जाईल. काही राज्यांमध्ये लोक ऑनलाइन स्लॉट बुकिंग केल्यानंतरही लस घेण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या दिवशी गैरहजर राहतात. त्यामुळं लस वाया जाण्याचीही शक्यता असते. तसेच ग्रामीण भागातील लोकांमध्ये अद्यापही ऑनलाईन नोंदणीविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळं नोंदणी होण्यात बऱ्याच अडचणी येतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ही प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळं दिवसाअखेरीस बर्याच वेळा उरलेली लस खराब होण्याची शक्यता असते. त्याबरोबरच ऑनलाइन अपॉईंटमेंट घेतल्यानंतरही लोक लस घेण्यासाठी त्यांच्या ठरलेल्या दिवशी त्यांच्यावेळेत पोहचत नाहीत. या गोष्टींचा विचार करता लोकांना जागेवर लस देण्याच्या सुविधेमुळं लस वाया जाण्याचं प्रमाण देखील कमी होईल. मोबाईल नंबरवरून 4 जणांची अपॉईंटमेंट घेण्याची सुविधा सरकारनं दिली असली, तरी त्यानंतरही ज्या लोकांकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोन नाही त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.