दिल्लीतील चित्रपटगृहे, मेट्रो, बसेस उद्यापासून सुरू होणार
![Cinemas, metro, buses in Delhi will start from tomorrow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/cinema-.jpg)
नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लगल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील निर्बंध आणखी शिथिल करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार उद्या, सोमवार २६ जुलैपासून चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू होतील. तसेच मेट्रो रेल्वेदेखील शंभर टक्के क्षमतेने धावणार आहेत. एवढेच नव्हे तर बसेसहीदेखील पूर्ण क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी दिल्लीत मेट्रो आणि बस हे ५० टक्के क्षमतेने धावत होत्या.
दिल्ली सरकारच्या आदेशानुसार विवाह सोहळ्यात आता ५० ऐवजी १०० नागरिक सहभागी होऊ शकतील. अंत्यसंस्कार, दफनविधी आणि संबंधित विधीसाठी शंभर जणांना हजर राहता येईल. यापूर्वी केवळ २० लोकांनाच ही परवानगी देण्यात आली होती. तसेच रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू केली जाणार असून त्यांना सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सेवा देता येणार आहे. शहरातील सर्व बाजारपेठ, मॉलना सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळे सुरू केली असली तरी भाविकांना मात्र मनाई केली आहे. तर अर्थात शाळा आणि महाविद्यालये मात्र सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.