विषारी नागाने चावा घेतलेली वर्ध्यातली चिमुकली अखेर बचावली; दोन तास गळ्यात होता नाग
![Chimukali from Wardha, who was bitten by a poisonous snake, finally survived; The snake was around his neck for two hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/nag-vardha.jpg)
वर्धा |
वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात येणाऱ्या बोरखेडी कला या गावात एका मुलीला कोब्राने दंश केल्याची घटना घडली होती. सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात तब्बल चार दिवसांच्या उपचारानंतर या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर आहे. सात वर्षीय परी पद्माकर गडकरी आणि तिचे आई-वडील रात्री अकरा-बाराच्या सुमारास घरात झोपी गेले होते. रात्री १२ च्या सुमारास त्यांच्या घरात कोब्रा नाग शिरला आणि मुलगी परीच्या गळ्याच्या बाजूला फणा काढत डोलत होता. गाढ झोपेत असताना अचानक नागाच्या फुसकारण्याचा आवाज येत असल्याने शेजारी झोपलेली आई जागी झाली. जमिनीवर झोपलेल्या मुलीच्या गळ्यात गुंडाळलेला नाग पाहून आई-वडीलांना धक्काच बसला होता.
कोब्रा सुमारे दीड तास या मुलीच्या गळ्यात होता. नंतर मुलीला वाचवण्यासाठी साप पकडणाऱ्याची मदत घेण्यात आली. आजुबाजुला सुरू असलेल्या गोंधळामुळे मुलगी सुद्धा झोपेतून जागी झाली. पण पालकांनीच तिला ‘हलू नको बेटा स्तब्ध रहा!‘ असाच सल्ला दिला. मुलगी घाबरली नाही आणि शांत पडून राहीली. त्यानंतर लगेच सर्पमित्रांना बोलविण्यात आले. तब्बल दोन तास चाललेला हा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. हे दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर शहारे येत होते. शेवटी रात्री २ च्या सुमारास त्या कोब्राने मुलीच्या गळ्यातून विळखा सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काही भाग मुलीच्या पाठीखाली दबून असल्याने त्या अतिशय विषारी सापाने अखेर त्या मुलीच्या हाताला चावा घेतला आणि दिसेनासा झाला होता. दरम्यान, कोब्राने परीला दंश केल्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परीला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.