चव्हाणांनी नाकारली ‘तुतारी’ची ऑफर, काँग्रेसच्या चिन्हावर ठाम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Untitled-design-15-780x470.jpg)
सातारा : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांना तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती . मात्र, चव्हाण यांनी ही ऑफर नाकारत काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढण्याची ठाम भूमिका घेतली. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे उमेदवारीचा तिढा कायम आहे.. सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.
सातारा लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार ठरविण्यासाठी पहिल्यांदाच खासदार शरद पवार यांना साताऱ्यात यावे लागले. त्यांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर राष्ट्रवादीतील चार नावे अंतिम केली. यामध्ये आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने व सत्यजित पाटणकर यांच्या नावांचा समावेश होता. या चौघांपैकी बाळासाहेब पाटीलांनी लोकसभा लढण्यास नकार दिला, तर सुनील माने व सत्यजित पाटणकर हे नवीन उमेदवार असून, ते खासदार उदयनराजेंच्य विरोधात टिकणार का? हा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे पवार यांच्यापुढे काँग्रेसकडून आलेल्या प्रस्तावानुसार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविले होते.
हेही वाचा – ‘माझे तिकीट जरी कापले असले तरी मी फॉर्म भरणार’; भावना गवळी
जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली होती. यामध्ये पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांना सातारा लोकसभा तुतारीच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव पृथ्वीराज चव्हाण यांनी नाकारला. पण, ते काँग्रेसच्या चिन्हावर सातारा लोकसभा लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आता इच्छुकांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे श्रीनिवास पाटील यांनाच यावेळेसही उमेदवारी द्यावी, अशी मागणीही काही पदाधिकारी करू लागले आहेत.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. आजही खासदार शरद पवार कोणताही चांगला निर्णय घेताना साताऱ्यातून त्याची सुरुवात करतात. सातारकरांनीही पवार यांच्यावर मनापासून प्रेम केले आहे. आता या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या फुटीमुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीत सातारची जागा मिळणार नसल्याचे दिसत आहे. कारण भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजेंनी येथून तयारीही सुरू केली आहे, तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यामुळे इथून पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास सांगितले, तर राष्ट्रवादीचे चिन्ह जिल्ह्यातून हद्दपार होण्याची भीती आहे. त्यामुळे पवार कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचाच उमेदवार देणार हे निश्चित झालं आहे.