पूर्व आशियात तणाव वाढला; उत्तर कोरियाने डागले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, जपानमध्ये हाय अलर्ट

North Korea Ballistic Missile | पूर्व आशियात तणाव वाढवणारी मोठी घडामोड समोर आली आहे. उत्तर कोरियाने पूर्व दिशेने समुद्राकडे संशयास्पद आंतरखंडीय (बॅलिस्टिक) क्षेपणास्त्र डागल्याची माहिती समोर आली आहे. जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने या प्रक्षेपणाला दुजोरा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जपानच्या पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने डागलेले आंतरखंडीय क्षेपणास्त्र समुद्राच्या दिशेने प्रक्षेपित करण्यात आले आहे. या संदर्भात अधिक माहिती लवकरच देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : गुढीपाडव्यापासून विविध कार्यक्रमांनी सजणार ‘दगडूशेठ’चा संगीत महोत्सव
या घटनेनंतर जपानच्या पंतप्रधान सनाए ताकायची यांनी तात्काळ आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत. क्षेपणास्त्राच्या संभाव्य मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा आणि तटरक्षक दलाला सतर्क करण्यात आले आहे.
जपानच्या सरकारी वृत्तसंस्था एनएचकेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाच्या या नव्या क्षेपणास्त्र चाचणीमुळे पूर्व आशियातील सुरक्षा परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जपानच्या तटरक्षक दलाने समुद्रातील जहाजांना तातडीचा इशारा देत पुढील सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, पश्चिम आशियात आधीच इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू असताना उत्तर कोरियाच्या या हालचालीमुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.





