CBSE बोर्डाची १०वीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार
![Attend Sadenoula's paper of eleven, there will be thermal screening; Rules for students](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/board-exams-1584594992.jpg)
नवी दिल्ली – कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडल्यामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार CBSE बोर्डाची दहावीची परीक्षा नेहमीप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार आहे. सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियंत्रक सनम भारद्वाज यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी सीबीएसई बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यासाठी बोर्डाकडून सध्या तयारी सुरु आहे. कोरोना काळात सीबीएसई बोर्डाने पुरवणी परीक्षा यशस्वीपणे पार पाडल्या होत्या.
यंदा कोरोना संकटामुळे देशभरातील शैक्षणिक अभ्यासक्रमाचे वेळापत्रक कोलमडले आहे. बहुतांश राज्यांमध्ये अजूनही शाळा आणि महाविद्यालये सुरु झालेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा पार पडणार, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दहावीच्या प्रॅक्टिकल परीक्षांसाठी शाळा लवकर उघडण्याचे संकेत सीबीएसई बोर्डाने दिले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी पूर्ण वेळ दिला जाईल. एरवी सीबीएसई बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षा या साधारण दीड महिना चालतात. मात्र, यंदा या परीक्षांसाठी दोन महिन्यांपेक्षा अधिक वेळ लागू शकतो.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता आहे. याबाबत स्वतः राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. सरकार कोरोनाचा विचार करता फेब्रुवारीत होणाऱ्या १२वीच्या परीक्षा एप्रिलमध्ये आणि मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्यावर विचार करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते.
यापूर्वी राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबरमध्ये होणारी एटीकेटी परीक्षा देखील पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. वर्षा गायकवाड यांनी स्वतः याबाबत माहिती दिली होती. दरवर्षी दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाते.