#Budget2021 कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकार ३५ हजार कोटी देणार
नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा २०२१-२२ वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कोरोना लसीविषयी मोठी घोषणा केली. कोरोनाचा जगावर मोठा परिणाम झाला असून कोरोना साथीला सामोरे जाण्यासाठी भारताने मोठी पावलं उचलली आहेत. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थमंत्री म्हणाल्या, सरकारने आरोग्य आणि आरोग्य क्षेत्राचं बजेट 94 हजार कोटी रुपयांवरून 2.38 लाख कोटी रुपये केलं आहे. या माध्यमातून देशातील सर्व लोकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात येतील.
दरम्यान, सध्याच्या घडीला मंदावलेली अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे. सध्या भारतात पहिल्या टप्प्याचे लसीकरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प सादर होत असताना, अनेकांचे लक्ष कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरकार किती रक्कमेची तरतूद करणार? याकडे लागले होते. त्यानंतर अर्थमंत्री सीतारमण यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली.
केंद्र सरकारने 100 हून अधिक देशांतील लोकांना कोरोनाविरुद्ध सुरक्षा प्रदान केली आहे. पंतप्रधानांनी वैज्ञानिकांना श्रेय देत या लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात केली. भारत खरोखरच शक्यता आणि अपेक्षेचा देश होण्यासाठी तयार आहे, असे निर्मला सीतारमण यावेळी म्हणाल्या. तसेच कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त मदतीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ‘भारतात सध्या सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसी उपलब्ध आहेत. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढच्या काही दिवसांत आणखी दोन कोरोना प्रतिबंधक लसी उपलब्ध होतील, असे अर्थमंत्री म्हणाल्या.
तसेच ‘2020-21 या आर्थिक वर्षात सरकारने 4.21 लाख कोटी रुपये खर्च केले. 2021-22 या आर्थिक वर्षात सरकारने 4.39 लाख कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यावेळी आरोग्य क्षेत्राचे बजेट 94 हजार कोटींवरून 2.38 लाख कोटी करण्यात आले आहे’, अशी माहिती सीतारमण यांनी दिली.