पाकिस्तानी रेंजर्सकडून बीएसएफ जवान पूर्णम शॉ यांची सुटका, २० दिवसांनी भारतात परत

BSF Jawan Purnam Shaw | पंजाबच्या फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमा चुकून ओलांडल्याने २३ एप्रिल रोजी पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतलेले बीएसएफ जवान पूर्णम शॉ यांची अखेर सुटका झाली आहे. बुधवारी (दि. १४ मे) सकाळी १०.३० वाजता अमृतसरमधील अटारी पोस्ट येथे पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना भारताच्या स्वाधीन केले. बीएसएफने निवेदनाद्वारे सांगितले की, जवानाचे हस्तांतर शांततापूर्ण आणि प्रोटोकॉलनुसार पार पडले.
बीएसएफने निवेदनाद्वारे सदर माहिती दिली आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी २३ एप्रिल रोजी ताब्यात घेतलेल्या जवान पूर्णम कुमार शॉ यांना भारताच्या स्वाधीन केले आहे. अमृतसरमधील अटारी पोस्ट येथे आज सकाळी १०.३० वाजता त्यांना सोडण्यात आले. बीएसएफ जवानाचे हस्तांतर अतिशय शांततापूर्ण आणि प्रोटोकॉलनुसार पार पडले.
हेही वाचा : माटे प्रशालेचा शंभर टक्के निकाल
४० वर्षीय पूर्णम शॉ, मूळ पश्चिम बंगालचे रहिवासी, हे बीएसएफच्या १८२ व्या बटालियनचे जवान आहेत. २३ एप्रिल रोजी फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपणाजवळ गस्त घालत असताना ते विश्रांतीसाठी सावलीत थांबले आणि चुकून सीमेपलीकडे गेले. त्यावेळी त्यांनी गणवेश परिधान केलेला होता आणि सर्व्हिस रायफलही सोबत होती. यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले.
पूर्णम शॉ यांच्या सुटकेसाठी भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी रेंजर्स यांच्यात बैठक झाली. या बैठकीत तोडगा निघाल्यानंतर तब्बल २० दिवसांनी त्यांची सुटका झाली. सध्या पूर्णम शॉ यांची सुरक्षा अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.