ब्राझीलच्या संसद, राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्टात घुसून नागरिकांची तोडफोड
निवडणुकीत बोल्सोनारो यांचा पराभूव झाल्यामुळं संसदेत मोठा हिंसाचार
मुंबई : ब्राझीलच्या संसदेत मोठी घटना घडली आहे. ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांच्या समर्थकांनी संसद भवनात गोंधळ घतला. नवे राष्ट्रपती म्हणून लुईज इनासियो लुला डि सिल्वा यांनी शपथ घेतल्याने बोलसोनारो यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. या आंदोलकांनी थेट बाझिलच्या संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात घुसून धुडगूस घातला आहे.
प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेकडो निदर्शकांना अटक केली. आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून काँग्रेस राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात प्रवेश केला. ब्राझिलियन पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी ब्राझिलियातील थ्री पॉवर स्क्वेअरभोवती सुरक्षा घेरा तयार केला. पोलिसांनी त्यांना राष्ट्रीय काँग्रेस, प्लानाल्टो पॅलेस आणि सर्वोच्च न्यायालयात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक पुढं जात राहिले. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या सोडल्या, पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही.
मिळालेल्या माहिती नुसार 30 ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीत बोल्सोनारो हे प्रतिस्पर्धी दा सिल्वा यांच्याकडून पराभूत झाले. यानंतर त्यांचे समर्थक देशभरात आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वी डावे नेते लुईझ इनासियो लुला डी सिल्वा यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ते तिसऱ्यांदा ब्राझीलचे अध्यक्ष झाले आहे.
या घटनेनंतर आंदोलकांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये काँग्रेस भवनात प्रवेश करण्यासोबतच आंदोलक दरवाजे आणि खिडक्या तोडताना दिसत आहेत. ते एकत्र येऊन खासदारांचे कार्यालय फोडत असल्याचंही व्हिडिओत दिसतंय. यावेळी त्यांनी बॅनर लावण्याचाही प्रयत्न केला.