भाजप नेते प्रमोद सावंत दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान;
![BJP leader Pramod Sawant becomes Goa's chief minister for the second time;](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/pramod-sawant-goa-chief-minister.png)
पणजी | भाजप नेते प्रमोद सावंत दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदी कोण बसणार असा प्रश्न प्रत्येकाला सतावत होता. मात्र, यावर आता शिक्कामोर्तब झालं असून प्रमोद सावंत यांची नियुक्त करण्यात आली आहे. . मुख्यमंत्री निवडीसाठी पर्यवेक्षक म्हणून आलेले भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा केली. त्यावेळी भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.
विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्री पदासाठी दावा ठोकला होता. त्यामुळे प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणे यांच्यात खडाजंगी रंगली होती. निकालाला दहा दिवस उलटून गेले तरी गोव्यात भाजपला सरकार स्थापन करता आलेलं नाही. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सावंत आणि राणे यांना दिल्लीला बोलावून घेतलं होतं. या दोन्ही नेत्यांनी सावंत आणि राणेंशी मॅरेथॉन चर्चा केल्यानंतर आज अखेर सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे विश्वजित राणे यांनीच आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमतानं मंजूर करण्यात आल्याचं नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं.