क्रिप्टो बाजारात मोठी उलथापालथ! बिटकॉइन गडगडला
![Big upheaval in the crypto market! Bitcoin crashed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/bitcoin_1-sixteen_nine_0.jpg)
नवी दिल्ली – जगभरात ओमिक्रॉन व्हेरियंटचा वाढता धोका आणि भारतात क्रिप्टोकरन्सीबाबतच्या धोरणावर चर्चा सुरू असताना शनिवारी क्रिप्टो बाजारात मोठी उलथापालथ झाली. जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिप्टो बिटकॉइनमध्ये 17 टक्क्यांची घसरण दिसून आली. एका क्षणी बाजारात बिटकॉइनने 42000 डॉलर इतका नीचांकी स्तर गाठला होता. भारतीय रुपयांनुसार, क्रिप्टोचा दर 31.70 लाख प्रति बिटकॉइनच्या स्तरापर्यंत आला होता. मात्र सुरुवातीला जवळपास 10 हजार डॉलरने दर कोसळल्यानंतर बिटकॉइनचा दर पुन्हा सावरू लागला आणि 47700 डॉलर इतक्या स्तरावर पोहोचला.
10 नोव्हेंबर रोजी 69,000 डॉलरच्या पातळीला स्पर्श केल्यापासून बिटकॉइनमध्ये सातत्याने घसरण होत आहे. आतापर्यंत सुमारे 21,000 डॉलरची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे, जगातील दुसऱ्या क्रमांकाची क्रिप्टोकरन्सी इथेरियमच्या दरातही 15 टक्क्यांची घट दिसून आली. इथेरियमचा दर हा 3900 डॉलर इतक्या पातळीवर आला. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे क्रिप्टोबाजारात घसरण झाली असल्याची चर्चा आहे.