विधानसभा निवडणुकांनंतर मोठा धक्का; डिझेलच्या दरात लिटरमागे तब्बल 25 रुपयांची वाढ
नवी दिल्ली | देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील चार महिन्यांहून अधिक काळ स्थिर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या भावाचा भडका उडूनही पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढ टाळली होती. आता निवडणुकीनंतर पहिला मोठा धक्का बसला आहे. आता डिझेलच्या दरात लिटरमागे तब्बल 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ घाऊक ग्राहकांसाठी लागू झाली आहे.
घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात प्रतिलिटर तब्बल 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत डिझेलचा दर प्रतिलिटर 122.05 रुपयांवर गेला आहे. याचवेळी किरकोळ ग्राहकांसाठी डिझेलचा दर प्रतिलिटर 94.14 रुपये आहे. दिल्लीत घाऊकचा डिझेल दर प्रतिलिटर 115 रुपये आणि किरकोळसाठी प्रतिलिटर 86.67 रुपये आहे. घाऊक ग्राहकांमध्ये बस चालवणाऱ्या राज्य सरकारी कंपन्या, मॉल तसेच, इतर उद्योग त्यांच्या वापरासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करतात. त्यांच्यासाठी किरकोळ ग्राहकांपेक्षा आता अधिक दर आकारण्यात आला आहे.