काबुल विमानतळावर २४-३६ तासात पुन्हा हल्ल्याची शक्यता, जो बायडन यांचा इशारा
काबुल – अफगाणिस्तानमधील काबुल विमानतळावर आणखी एका आत्मघातकी हल्ल्याची शक्यता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्वतः शनिवारी याबाबत इशारा दिला. हा हल्ला पुढील २४-३६ तासात होण्याची शक्यता आहे. जमिनीवरील परिस्थिती धोकादायक तयार झालीय. विमानतळावर दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढलाय. पुढील काही काळात हे हल्ले होण्याची शक्यता असल्याची माहिती सैन्याच्या कमांडरांनी दिलीय, असेही बायडन यांनी नमूद केले आहे.
काबुलच्या हामिद करजई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर गुरुवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात एक सुसाईड बॉम्बर आणि आयएसआयएस-केचे अनेक दहशतवाद्यांनी १३ अमेरिकन सैनिक आणि १६९अफगाण नागरिकांची हत्या केली. आता पुन्हा हल्ल्याची शक्यता असल्याने अमेरिकन सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. बायडन यांनी देखील वॉशिंग्टनमध्ये राष्ट्रीय सुरक्षा टीम आणि काबुलमधील सैन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केलीय.
बायडन म्हणाले, “अमेरिकेने हल्ल्याला चोख उत्तर देत अफगाणिस्तान मधील दहशतवादी गट आयसिस-के विरोधात एअर स्ट्राईक केले. हा हल्ला शेवटचा नाहीये. हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्वांना याची किंमत चुकवावी लागेल. जेव्हा केव्हा कुणी अमेरिकेला नुकसान पोहचवेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ.” अमेरिकेच्या या ड्रोन हल्ल्यात आयसिसचे दोन दहशतवादी मारले गेलेत आणि एक जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
बायडन म्हणाले होते, “आम्ही अफगाणिस्तानमधील अमेरिकन नागरिकांना वाचवू. आमचे मिशन सुरू असून अफगाणच्या सहकाऱ्यांना आम्ही बाहेर काढू. अजूनही कमीत कमी १,००० अमेरिकन नागरिक आणि इतर अनेक लोक काबुलमधून निघण्यासाठी संघर्ष करत आहेत.”
“अमेरिकेला हे माहिती आहे की या हल्ल्याचा आदेश देणारा आयसिसचा नेता कोण होता? तो कोठेही असेल, तरी त्याला कोणतेही मोठे मिलिट्री ऑपरेशन न करता आम्ही पकडू. मिलिट्री कमांडर्सला ISIS-K वर स्ट्राईक करण्याचा प्लॅन करण्यास सांगण्यात आले आहे. आता जागाही आम्ही निवडलेली असेल आणि वेळही, तिथेच हल्लेखोरांना उत्तर देऊ,” असेही मत बायडन यांनी व्यक्त केले होते.