भारताहून येणाऱ्या विमानांना कॅनडात बंदी
![Ban on flights from India to Canada](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Airlines-delayed.jpg)
ओटावा – कॅनडा सरकारने भारतातून येणाऱ्या विमानांवरील बंदी पुन्हा वाढविली आहे. त्यामुळे २१ जुलै रोजी संपणारी ही बंदी आता २१ ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आणि डेल्टा व्हेरिएंटचा वाढता प्रभाव यामुळे कॅनडाने पहिल्यांदा २२ एप्रिल रोजी भारतातून येणाऱ्या विमानांवर निर्बंध लावले होते. तेव्हापासून आतापर्यंत हे निर्बंध चौथ्यांदा वाढविण्यात आले आहेत.
कॅनडाच्या आरोग्य विभागाने सोमवारी एक पत्रक जारी केले. ज्यात कोरोनाबाबत नव्या नियमावलींचा उल्लेख होता. त्यात असे नमूद केले आहे की, भारतातून थेट कॅनडात येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र भारतातून निघाल्यावर एका वेगळ्या देशात उतरून तिथून विमानाने कॅनडात येणाऱ्या प्रवाशांना बंदी नाही. परंतु त्या वेगळ्या देशात प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेणे आवश्यक असून त्या चाचणीचे निगेटिव्ह अहवाल सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
कॅनडा प्रशासनाने म्हटले आहे की, देशातील कोरोनाचा कहर अगदी कमी होऊन परिस्थिती ठीक झाल्यास ७ सप्टेंबरपर्यंत पूर्ण लसीकरण झालेल्या परदेशी प्रवाशांसाठी आपल्या सीमा उघडण्यात येतील. या प्रवाशांचे लसीकरण कॅनडात येण्याआधी कमीत कमी १४ दिवसांपूर्वी झालेले असावे, असे कॅनडाने स्पष्ट केले आहे.