पुरस्कार मनोहरपंतांना, डिवचले उद्धवपंतांना !
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्राची पद्म पुरस्कारांची यादी जाहीर झाली, अन् महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या. अर्थात् त्याची जाहीर वाच्यता झाली नसली तरी, दिवंगत मुख्यमंत्री मनोहरपंत जोशी यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मुळीच आवडलेले नसणार ! एका अर्थाने भारतीय जनता पार्टीने मनोहरपंतांना हा पुरस्कार देऊन उद्धवपंतांना आणि त्यांच्या शिवसेनेला चांगलेच डिवचले आहे, हे प्रत्येक राजकारणाच्या लक्षात आले असणार…
एकेकाळी, मनोहर जोशी हे शिवसेनेमधील मोठे नाव. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरचा मोठा नेता म्हणजे मनोहर जोशीसर! भाजपा आणि शिवसेनेची सत्ता ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आधी त्यावेळी मुख्यमंत्री होण्याचा मान बाळासाहेबांनी मनोहर जोशींनाच दिला होता. जोशी नावाच्या या दिग्गज नेत्याचे पंख कापण्याचे काम ज्यावेळी उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख झाले त्यावेळी त्यांच्या चेल्यांनी केले, हे देखील सर्वांना माहीत आहे.
नंतरच्या काळात शिवसेनेमध्ये एकाकी पडलेल्या मनोहर जोशींना क्षणोक्षणी अपमानित केले गेले. एवढेच काय, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात व्यासपीठावरून त्यांनी निघून जाण्यापर्यंतची तयारी उद्धवपंतांच्या अनुयायांनी केली.. त्यांना अक्षरशः हाकलून लावले, हा इतिहास अगदी ताजा आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, की मनोहरपंतांचा गौरव करून भाजपाने उद्धवपंत आणि शिल्लक सेनेची नांगी ठेचली आहे.
मनोहर जोशी यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार असल्याचे वाचले. तसे पाहिले तर पटकन विश्वासच बसला नाही. हे मनोहर जोशी म्हणजे आपले दिवंगत शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते, माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर गजानन जोशी हेच असल्याचे जेव्हा मनाने निश्चित केले तेव्हा, समजून चुकलो, की भाजपाने उद्धवपंतांची ठासली
पुरस्काराला जरा उशीरच
तसे पाहिले तर, जोशी सरांना हा पुरस्कार खूप आधीच मिळायला हवा होता. मात्र, त्यांच्या उतरत्या दिवसात शिवसेना पक्षातच त्यांना अपमानित केले गेले आणि त्यामुळे ते उद्विग्न होऊन राजकीय जीवनापासून निवृत्त झाले होते. मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देऊन केंद्र सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव तर केला आहेच, पण त्यांचा अपमान करणाऱ्या उद्धवपंत ठाकरे यांना भाजपाच्या मोदी सरकारने सणसणीत चपराकही लावली आहे.
प्रयोगशील यशस्वी मुख्यमंत्री
जोशीसर हे शिवसेनेचे एका काळातले पहिल्या फळीतले नेते. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संपर्क आल्यामुळे ते शिवसेनेत आले आणि बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू शिवसैनिक बनले. ते मुंबईचे महापौर बनले. नंतर आधी विधान परिषदेत आणि नंतर विधानसभेत सदस्य म्हणून गेले. काही काळ ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते देखील होते. १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना, भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार आले, तेव्हा पहिल्यांदाच ते महाराष्ट्रातील गैर काँग्रेसी मुख्यमंत्री बनले, एवढा बाळासाहेबांचा त्यांच्यावर विश्वास होता.
मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी अनेक नवे प्रकल्प राबवले. महाराष्ट्रात एक रुपयात झुणका भाकर देण्याचा प्रयोग त्यांनी सर्वप्रथम यशस्वी केला. मुंबई, पुणे द्रुतगती महामार्गाची उभारणी त्यांच्याच काळात झाली. कृष्णा खोरे सिंचन विकास मंडळ स्थापन करून कृष्णा खोऱ्याचे पाणी अडवण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी केला. त्याच धर्तीवर मराठवाडा सिंचन विकास मंडळ आणि विदर्भ सिंचन विकास मंडळ हे देखील त्यांनी स्थापन केले आणि तिथलेही दीर्घकाळ प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावले होते. एक प्रयोगशील मुख्यमंत्री म्हणून ते चांगलेच गाजले होते, त्यांचा गाजावाजा संपूर्ण देशभर झाला.
लोकसभेच्या सभापतीपदी वर्णी
आजही स्पष्टपणे आठवते, की १९९९ मध्ये ते दादर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. लगेचच केंद्रातील अटल बिहारी वाजपेयी सरकार मध्ये ते अवजड उद्योग मंत्री बनले. तिथेही आपल्या प्रयोगाशील व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर त्यांनी केंद्रात आपले स्थान निर्माण केले. तत्कालीन लोकसभा सभापती बालयोगी यांचे अपघातात निधन झाले असता रिक्त जागेवर ते लोकसभेचे सभापती म्हणून निवडून गेले होते.
हेही वाचा – म्हाडाच्या पुणे मंडळाची ‘लॉटरी’ लांबणीवर, नवी तारीख झाली जाहीर
उद्धव ठाकरेंची चलती, जोशी सरांची पीछेहाट
यानंतर दादरमधून लोकसभेला पराभूत होण्याची वेळ जोशीसरांवर आली.नंतर जोशीसर सहा वर्षे राज्यसभेवर शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून निवडून गेले. राज्यसभेची मुदत संपल्यावर सर शिवसेनेच्या कामातच सक्रिय झाले होते. याच दरम्यान बाळासाहेबांचे निधन झाले. नंतर उद्धव ठाकरेंचे राज्य सुरू झाले. या काळात मनोहर जोशी शिवसेनेच्या पहिल्या फळीतून काहीसे दूर फेकले गेले, उद्धव ठाकरे यांच्या नव्या चौकडीने जोशीसरांना बाजूला काढले. त्यातच शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील एका मेळाव्यात त्यांना अपमानित करून व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आले. तेव्हापासून ते चांगलेच दुखावले गेले होते. तेव्हापासूनच त्यांनी सक्रिय राजकारणातून काहीशी निवृत्त घेतली, त्यांनी मूळ शिवसेनेच्या प्रवाहातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. ते पूर्ण विजनवासात गेले आणि गेल्या वर्षी दि.२३ फेब्रुवारी २०२४ला सकाळी सर गेल्याचीच बातमी आली.
दिलदार आणि जिंदादिल व्यक्तिमत्व
जोशी सर म्हणजे एक आगळे वेगळे जिंदादिल व्यक्तिमत्व! त्यांची कदर स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केली. त्याचप्रमाणे जोशीसरांनीही शिवसेना वाढवण्यासाठी तन-मन-धनाने प्रयत्न केले. मात्र, बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांनी त्यांची कदर केली नाही. त्यांचा उपयोग तर करून घेतला नाहीच, पण त्यांना अपमानित करून बाजूला लोटले. वस्तूतः, शिवसेनेनेच त्यांना सन्मानित करून त्यांना पद्म पुरस्कार द्यावा, यासाठी पंतप्रधानांकडे शिफारस करायला हवी होती, मात्र, ती दानत उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे नाही, हे दुर्दैव !
पण, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी त्यांची कदर करून मनोहर जोशीसरांना मरणोत्तर का होईना पण पद्मभूषण पुरस्कार दिला आहे. त्याबद्दल केंद्र सरकारही अभिनंदनास पात्र आहे, हे निश्चित.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सध्या शिल्लक असलेल्या शिवसेनेला आणि त्यांच्या नेतृत्वाला केंद्र सरकारने दिलेली सणसणीत चपराक आहे. तुम्ही एका हिऱ्याला दूर लोटले आणि त्याचा अपमान केला. मात्र आम्ही त्याची कदर केली आहे हे दाखवून दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकेकाळी जवळचे होते आणि युती करूनच लढत होते. गेल्या काही दिवसात दोघांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. या नव्या राजकारणात भाजपाने उद्धव ठाकरे यांचा पक्ष पूर्णपणे मोडीत काढून प्रचंड सूड उगवला आहे. उद्धव ठाकरेंना तोंडावर पाडण्याची एकही संधी भाजपा सोडत नाही. त्याच कुरघोडी चा भाग म्हणून मनोहरपंतांचा गौरव आणि त्या माध्यमातून उद्धवपंतांना मोठी चपराक, असे हे राजकारण नक्की आहे. पण, यामुळे जोशीसरां सारख्या योग्य राजकारण्याचा प्रतिष्ठेच्या राजकारणाचा गौरव झाला, हे मात्र मान्य करायलाच हवे !