पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
![पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Farmers-new.jpg)
कोल्हापूर |
कृषी वीज पुरवठा पूर्वसूचना न देता खंडित केल्याने शेतकऱ्यांने कोल्हापुरातील महावितरणच्या कार्यालयात आज (सोमवार) सायंकाळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी शेतकरी आणि महावितरणचे अधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. करवीर तालुक्यातील महे, वाशी, कोगे, कसबा बीड आदी गावातील कृषी पंप वीज पुरवठा महावितरणने आज सकाळी खंडित केला. त्यामध्ये काही सहकारी पाणीपुरवठा संस्थांचाही समावेश आहे. वीजबिल थकीत असल्याच्या कारणावरून वीजपुरवठा खंडित केल्याचे महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांचे म्हणणे होते.
- पण काडेपेटी ओली झाल्यामुळे ती न पेटल्याने अनर्थ टळला…
या उत्तरानंतर शेतकऱ्यांनी येथील महावितरणच्या मुख्य कार्यालयात प्रवेश केला. यातील निवास पाटील या शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून खिशातील काडीपेटीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण काडेपेटी ओली झाल्यामुळे ती न पेटल्याने दुर्घटना घडली नाही. यानंतर ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यातून अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार वाद रंगला.
- राज्य शासन शेतकरी विरोधात सूडभावना ठेवून वागत आहे…
याबाबत पत्रकारांशी बोलताना दीपक पाटील म्हणाले, एकीकडे राज्य शासन, ऊर्जामंत्री हे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित केला नाही अशा घोषणा करत आहे. पण महावितरणचे अधिकारी पूर्वसूचना न देता कृषी वीजपुरवठा खंडित करीत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून दुरुत्तरे मिळत आहेत. राज्य शासन शेतकरी विरोधात सूडभावना ठेवून वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.