TOP Newsताज्या घडामोडी

पाऊस माघारी फिरताच राज्यात थंडीची चाहूल; राज्यभर रात्रीच्या तापमानात झपाटय़ाने घट

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे माघारी फिरताच राज्यातील हवामानात झपाटय़ाने बदल होत आहे. रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली असून, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ात गारवा वाढत आहे. विदर्भातही रात्री हलका गारवा जाणवत आहे. राज्यात पुढील आठवडाभर कोरडय़ा हवामानाची स्थिती राहणार आहे. त्यामुळे रात्रीचे किमान तापमान सरासरीखालीच राहण्याचा अंदाज असून, दिवसाच्या कमाल तापमानात काही प्रमाणात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे.

देशात १४८ दिवसांचे वास्तव्य करून २३ ऑक्टोबरला र्नैऋत्य मोसमी वारे देशातून माघारी परतले. त्यामुळे संपूर्ण राज्यातच सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे बहुतांश भागात आकाश निरभ्र झाले आहे. बाष्प कमी झाल्याने पावसाळी स्थिती निवळली आहे. दिवाळीच्या कालावधीत पाऊस विश्रांती घेऊन आकाश निरभ्र होण्याची शक्यता आठवडय़ापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार सध्याची स्थिती आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागांत, तर कोकणात काही ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानात घट झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ातही काही भागांत किमान तापमानात घट होत आहे.

पावसाळी स्थिती असताना अगदी दोनच दिवसांपूर्वी राज्यात सर्वच भागांत रात्रीचे किमान तापमान २० अंशांच्या पुढे होते. मध्य महाराष्ट्रात २१ ते २२ अंश, मराठवाडा आणि विदर्भात २१ ते २३ अंश, तर मुंबई परिसरासह कोकण विभागात रात्रीचे किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. हे तापमान सरासरीच्या तुलनेत १ ते ४ अंशांनी अधिक होते. त्यात दोनच दिवसांत मोठा बदल झाला आहे. रात्रीचे किमान तापमान कमी होत असून, दिवसाचे कमाल तापमान वाढत आहे. सध्या सर्वत्र रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे. सध्या मध्य महाराष्ट्रात किमान तापमान १२ ते १४ अंशांपर्यंत खाली आले आहे. कोकणात १९ ते २२, मराठवाडय़ात १४ ते १७, तर विदर्भात १७ ते १८ अंशांपर्यंत रात्रीचे तापमान खाली आले आहे. राज्यातील निचांकी तापमान महाबळेश्वर येथे १२.२ अंश सेल्सिअस नोंदिवले गेले.

किमान तापमान (कंसात दोन दिवसांपूर्वीचे तापमान)

पुणे १४.४ (२१.८), जळगाव १५.०(२०.५), कोल्हापूर १८.६ (२२.६), नाशिक १४.२ (२१.२), सोलापूर १६.९ (२२.५), महाबळेश्वर १२.२ (१७.६), सांगली १६.५ (२१.६), सातारा १४.६ (२१.८), मुंबई २३.८ (२६.०), सांताक्रुझ २०.६ (२६.०), रत्नागिरी १९.२ (२४.६), औरंगाबाद १४.१ (२१.१), परभणी १७.० (२३.५), अमरावती १५.३ (१९.५), गोंदिया १७.८ (२०.०), नागपूर १७.० (२१.१), चंद्रपूर १८.० (२३.०)

‘सित्रांग’ चक्रीवादळ दोन देशांत

बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या ‘सित्रांग’ चक्रीवादळाने सध्या तीव्र रूप धारण केले आहे. त्याचा महाराष्ट्राला कोणताही फटका बसणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.
देशाच्या ईशान्य भागाला त्याचा तडाखा बसणार आहे. उत्तरेच्या दिशेने निघालेले हे चक्रीवादळ उत्तर-पूर्व भागात वळले असून, २५ ऑक्टोबरला हे चक्रीवादळ बांगलादेशात धडकणार आहे.
बांगलादेश पार करून ते भारतात प्रवेश करून ईशान्येकडील भागाला तडाखा देणार आहे. ओदिशा आणि पश्चिम बंगाल भागातही त्याचा परिणाम दिसून येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button