वाघाच्या हल्ल्यात पुन्हा एकाचा मृत्यू
![Another person died in a tiger attack](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/tiger-attack-1-1-780x470.jpg)
जंगलात गेलेल्या एका व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आरमोरी तालुक्यातील रामाळा परिसरात घडली. आनंदराव दुधबळे (५५ रा. रामाळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दोन दिवसात वाघाच्या हल्ल्यात लागोपाठ दोन बळी गेल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान सीटी १ वाघाचा वावर या परिसरात असल्याने हल्लेखोर वाघ हा तोच असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आरमोरी तालुक्यातील रामाळा गावातील आनंदराव दुधबळे दुपारी सिंधी तोडण्यासाठी तीन सहकाऱ्यासोबत जंगलात गेले होते. दरम्यान, जवळच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जंगलात दोन किलोमिटर आत फरफटत नेले. यात त्यांचा मृत्यू झाला. यावेळी उपस्थित सहकारी देखील काहीच करू शकले नाही. माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. काल शुक्रवारी पोर्ला वनपरिक्षेत्रातील देशपूर येथील गुराख्याला सुध्दा वाघाच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला होता. या परिसरात लागोपाठ होत असलेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. हल्लेखोर वाघ हा सीटी १ असल्याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही.