आनंद सुब्रमण्यमच अदृश्य ‘योगी’; सीबीआयला सापडला भक्कम पुरावा
![Ananda Subramaniam is the invisible ‘Yogi’; CBI finds strong evidence](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/chitra-ramkrushnan.png)
नवी दिल्ली | टीम ऑनलाइन
राष्ट्रीय शेअर बाजारातील को-लोकेशन प्रकरणी अटकेत असलेला आनंद सुब्रमण्यम हाच हिमालयातील तो अदृश्य योगी असल्याचे सीबीआयच्या तपासात आढळले आहे. एनएसईच्या माजी अध्यक्षा चित्रा रामकृष्ण ज्या योगीच्या ई-मेलवरून येणाऱ्या संदेशानुसार निर्णय घेत होत्या. तो ईमेल आयडी आनंद सुब्रमण्यम यांच्या मोबाईलशी अटॅच असल्याचा पुरावा सीबीआयच्या हाती लागला. त्यावरून हा योगी आनंद सुब्रमण्यमच असल्याचे मत सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
एनएसईचा फायनान्शियल डाटा आणि महत्त्वाची माहिती ज्या ई-मेलवर लिक झाली होती, तो ई-मेल सेबीने १९० पानांच्या अहवालात दिला आहे. हा ई-मेल आयडी सुब्रमण्यमच्या मोबाईलशी जोडला असल्याचे आणि काही माहिती त्याने फॉरवर्ड केली असल्याचे पुरावे सीबीआयला मिळाले आहेत. नष्ट केलेल्या लॅपटॉपचा आयपी ॲड्रेस आणि ईमेलचा आयपी ॲड्रेस एकच असल्याचेही तपासात उघड झाले आहे. सुब्रमण्यमच्या डेक्सटॉपवर या ई-मेल संदर्भात आणखी काही माहिती मिळाली आहे. या सर्व माहितीवरून हिमालयातील तो अज्ञात योगी आनंद सुब्रमण्यम असल्याचे स्पष्ट होते. चित्रा रामकृष्ण यांचा तो नातेवाईक आहे. त्यांनी त्याची एनएसईच्या सल्लागारपदी नियुक्ती केली होती. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या नव्हत्या. याशिवाय त्याला १.६८ कोटींचे पॅकेज दिले होते. सुब्रमण्यम त्यापूर्वी १५ लाखांच्या पॅकेजवर काम करत होता. ही सर्व माहिती तपासात उघड झाली आहे.