अमेरिकेने दिलेला शब्द पाळला; भारतात मदत दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Capturevyffuyfyyyyi.jpg)
नवी दिल्ली – भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या लाटेने देशभरात प्रचंड कहर माजवला आहे. अशा परिस्थितीत भारताच्या मदतीसाठी अनेक देश पुढे सरसावले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनीही भारताला कोरोना संकटात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज सकाळी अमेरिकेतून भारतात विमान दाखल झाले असून यामध्ये कोरोनाशी लढण्यासाठी वैद्यकीय मदत पाठविण्यात आली आहे. तसेच पुढील काही आठवड्यांत अमेरिकेतून आणखी विमाने मदत घेऊन भारतात दाखल होतील, असे समजते आहे.
भारतातील अमेरिकी दुतावासाने ट्विट करत म्हटले आहे की, ‘अमेरिकेतून आणीबाणीच्या कोविड संकटाशी लढण्यासाठी मदतीची पहिली खेप भारतात आली आहे. ७० वर्षांपासून एकमेकांना सहकार्य करत असून कोरोना संकटाशी लढा देण्यासाठी अमेरिका खंबीरपणे भारतासोबत आहे.’
दरम्यान, ‘आम्हाला गरज असताना भारताने मदत केली आहे त्यामुळे आता करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संकटात असताना आम्ही भारताला सर्वतोपरी मदत करू’, असे आश्वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर दिले होते. त्यानंतर आज सकाळी अमेरिकेच्या हवाई दलाचे सुपर गॅलॅक्सी विमान नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. या विमानातून ४०० ऑक्सिजन सिलेंडर्स, रुग्णालयांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य आणि १० लाख रॅपिट कोरोना टेस्ट किट पाठवण्यात आले आहे.