अमेरिकेच्या खास मित्रासोबत भारताचा ऐतिहासिक करार!
भारत आणि अमेरिका संबंध कमालीचे ताणले

आंतरराष्ट्रीय : गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध कमालीचा ताणले गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफमुळे भारत आता अन्य देशांशी आपले संबंध दृढ करून पाहात आहे. त्याचाच एक भाग म्हणून चीन देशाशी पुन्हा एकदा व्यापार वृद्धींगत करण्यासाठी भारताची चीनसोबत चर्चा चालू आहे. असे असतानाच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या इस्रायलने भारतासोबत महत्त्वाचा करार केला आहे. या करारामुळे आता भारत आणि इस्रायल यांच्यातील व्यापार वाढणार आहे. ट्रम्प यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
नेमका काय करार झाला?
मिळालेल्या माहितीनुसार भारत आणि इस्त्रायल यांच्यात एक महत्त्वाचा द्विपक्षीय करार झाला आहे. इस्रायलचे अर्थमंत्री बेझालेल स्मॉटरीच आणि भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या द्विपक्षीय परस्पर गुंतवणूक करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे आता दोन्ही देशांची एकमेकांसोबतची गुंतवणूक अधिक सुलभ होणार आहे. भारताच्या गुंतवणूकविषयक नव्या धोरणानुसार इस्रायल हा भारतासोबत करार करणारा पहिला OECD सदस्य देश ठरला आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
इस्रायलचे अर्थमंत्री बेझालेल स्मॉटरीच यांच्या नेतृत्त्वातील एक शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि इस्रायल यांच्यातील आर्थिक सहकार्याला चालना देणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. याच दौऱ्यादरम्यान 8 सप्टेंबर रोजी इस्रायल आणि भारताच्या अर्थमंत्र्यांनी द्विपक्षीय गुंतवणुकीच्या करारावर स्वाक्षरी केली. या स्वाक्षरीमुळे आता दोन्ही देशांतील अर्थिक भागिदारी आणखी मजबूत होणार आहे.
या कराराअंतर्गत काय फायदा होणार?
या करारामुळे आता इस्रायल आणि भारत या दोन्ही देशांना आर्थिक गुंतवणूक करणे सोपे होणार आहे. या कराराद्वारे एकमेकांच्या गुंतवणुकीसाठी सहकार्य केले जाईल. तसेच आपापल्या देशात गुंतवणूकदारांना हमी आणि संरक्षण दिले जाईल. दोन्ही देश एकमेकांच्या व्यापार वृद्धीसाठी तसेच गुंतवणुकीसाठी योगदान देतील. 1996 साली भारत आणि इस्रायल यांच्यात असाच एक करार करण्यात आला होता. 1996 सालच्या जुन्या कराराची जागा आता या नव्या कराराने घेतली आहे. 1996 सालचा करार 2017 साली रद्दबातल ठरवण्यात आला होता.