छत्तीसगडमध्ये पेटवली जाणार ‘अमर जवान ज्योती’; मुख्यमंत्री घोषणा करत म्हणाले, “ज्यांच्यासाठी माफिनामा दागिना…”
![छत्तीसगडमध्ये पेटवली जाणार ‘अमर जवान ज्योती’; मुख्यमंत्री घोषणा करत म्हणाले, “ज्यांच्यासाठी माफिनामा दागिना…”](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/amar-jyoti.jpg)
छत्तीसगड |
अमर जवान ज्योती विझवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयानंतर छत्तीसगडच्या भूपेश बघेल सरकारने येथे अमर जवान ज्योतीची पायाभरणी करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी ३ फेब्रुवारीला त्याची पायाभरणी करतील. शनिवारी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याबद्दल माहिती दिली आहे. ट्विट करून याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, “आपल्या शहीदांच्या शौर्यगाथा आपल्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहेत. जे देशासाठी लढत नाहीत त्यांना हे समजणार नाही. राहुल गांधी ३ फेब्रुवारीला छत्तीसगडमध्ये अमर जवान ज्योतीची पायाभरणी करणार आहेत. हीच भारतमातेच्या सुपुत्रांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
रविवारी पत्रकारांशी बोलताना भूपेश बघेल म्हणाले की, “काँग्रेसची विचारधारा गांधींपासून प्रेरित आहे. ती सत्य आणि अहिंसेबद्दल आहे. तर पंतप्रधान मोदींची विचारधारा सावरकर आणि गोडसे यांची असून ती हिंसाचार आणि कट रचणारी आहे. काँग्रेस आणि भाजपा हे एका नदीचे दोन वेगवेगळे किनारे आहेत,” असं त्यांनी सांगितलं. छत्तीसगडमध्ये अमर जवान ज्योतीची पायाभरणी करण्याबाबत भूपेश बघेल म्हणाले की, “काँग्रेस हा त्यागकर्त्यांचा पक्ष आहे आणि तो बलिदानाचा आदर करायला जाणतो. जो समाज आपल्या हुतात्म्यांचा सन्मान राखत नाही, त्यांच्या बलिदानाच्या स्मृती जपत नाही, त्यांच्या चिन्हांचा अपमान करतो, तो समाज उद्ध्वस्त होतो, याचा इतिहास साक्षीदार आहे. त्याचबरोबर छत्तीसगड अमर जवान ज्योतीमध्ये हुतात्म्यांच्या यादीची भिंत, मेमोरिअल टॉवरही तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नावांच्या यादीची भिंत सुमारे २५ फूट उंच आणि सुमारे १०० फूट लांब असेल, तर भिंतीची जाडी ३ फूट असेल,” अशी माहिती देण्यात आली आहे.
सीएम बघेल यांनी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त एका सरकारी कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यात ‘अबाइड विथ मी’ ही धूनही वाजवली जाणार आहे. भूपेश बघेल यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त छत्तीसगड पोलिस बँडतर्फे मरीन ड्राइव्ह, रायपूर येथे संध्याकाळी ५ वाजता एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गांधींच्या आवडत्या भजनांव्यतिरिक्त, त्यांची आवडती धून ‘अबाइड विथ मी’ देखील या कार्यक्रमात वाजवली जाईल. महत्वाचं म्हणजे ‘अबाइड विथ मी’ ही धून यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या बीटिंग रिट्रीट सेरेमनीमधून केंद्र सरकारने काढून टाकली होती.
'माफीनामे' जिनके लिए 'आभूषण' हों, वे शहादत का अर्थ नहीं समझेंगे.#अमर_जवान_ज्योति pic.twitter.com/nRfZUocDIQ
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) January 30, 2022