ब्रिटनमध्ये धोक्याची घंटा! ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरू
![Corona tsunami in Britain, 93,000 new patients in 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/coronavirus.jpg)
लंडन – ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा फैलाव जगभरातील अनेक देशांमध्ये झाला आहे. इंग्लंडच्या काही भागातही ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाला आहे, अशी माहिती ब्रिटनचे आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी सोमवारी संसदेत दिली. आकडेवारीनुसार, ब्रिटनमध्ये अशा प्रकाराचे एकूण २६१ रुग्ण आहेत. त्यापैकी स्कॉटलंडमध्ये ७१ आणि वेल्समध्ये ४ रुग्ण आहेत, असे त्यांनी सांगितले.
इंग्लंडमध्ये सापडलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांपैकी अनेकांनी परदेशवारी केलेली नाही. त्यामुळे इंग्लंडच्या काही भागात समूह संसर्ग झाल्याच्या निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, असे आरोग्यमंत्री जाविद यांनी सांगितले. कोरोनाचा हा फैलाव रोखण्यासाठी आम्ही यंत्रणा तयार केली आहे. त्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. कोरोनाविरुद्धची आमची लढाई निकराने सुरू आहे. नायजेरियाचाही लाल यादीत समावेश केला आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी हाऊस ऑफ कॉमनमध्ये सांगितले. कोरोनाच्या या प्रकारावर ब्रिटनचे शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. सध्याची कोणती लस त्यावर परिणामकारक ठरेल याचा अद्याप शोध लागला नसल्याचे त्यांनी सांगितले.