ताज्या घडामोडीविदर्भ

अहिल्याबाई नव्हे आता अहिल्यादेवी

राज्यभरातील मुलींच्या वस्तीगृहांना अहिल्यादेवींचे नाव

अहमदनगर : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आदर्शवत आहे. त्यामुळे राज्यभरातील मुलींच्या वस्तीगृहांना अहिल्यादेवींचे नाव दिले जाईल. सर्व सरकारी दस्तावेजांमध्ये अहिल्याबाईऐवजी ‘अहिल्यादेवी’ असा उल्लेख केला जाईल, तसेच धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले जाईल,’ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी चौंडी (ता. जामखेड) येथे केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २९९ जयंती उत्सव चौंडी येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री अतुल सावे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, आमदार राम शिंदे, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘आमदार राम शिंदे व गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष केला. परंतु जेव्हा आम्ही सरकार पालटून टाकले त्यानंतरच नाव बदलले गेले. आम्ही मनमोकळेपणाने शब्द देतो व ते पूर्ण करतो. आदिवासी समाजाच्या २२ योजनांचा लाभ धनगर समाजाला दिला जात आहे. धनगर समाजाच्या युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करता यावेत यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे धर्तीवर स्वतंत्र महामंडळ सुरू केले जाणार आहे. पुढील वर्षी अहिल्यादेवींचा त्रिशताब्दी जन्मोत्सव राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात साजरा केला जाईल. धनगर समाजाच्या युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करता यावेत यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे धर्तीवर स्वतंत्र महामंडळ सुरू केले जाणार आहे. अहिल्याबाईऐवजी अहिल्यादेवी असा उल्लेख सर्व शासकीय कागदपत्रातून करण्यासाठी स्वतंत्र आदेश काढले जाणार आहेत,’ असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

जन्मोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष अध्यक्ष राम शिंदे यांनी प्रास्ताविक केले. अहिल्यादेवींचे त्रिशताब्दी जन्म वर्ष सुरू झाल्याने पुढील वर्षभरात अहिल्यादेवींनी राज्यभरात उभारलेल्या विकास कामांचे संवर्धन व्हावे. काही ठिकाणी पुनर्बांधणी व्हावी, चौंडी हे गाव राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशा मागण्या त्यांनी केल्या.

जिल्ह्याचे नामकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानून पालकमंत्री विखे म्हणाले, ‘आचारसंहिता संपल्यावर नगरमध्ये मोठा कार्यक्रम घेऊन अहिल्यानगर नामकरण सोहळा केला जाईल. गुजरात मधील स्टेच्च्यु ऑफ युनिटीच्या धर्तीवर अहिल्यादेवींचा भव्य पुतळा व स्मारक नगरमध्ये केले जाणार आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा संकल्प आहे. त्या कामालाही सुरूवात झाली आहे. हे स्मारक येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरेलच परंतु महिलांच्या उत्कर्षासाठी नवी उर्जा देणारे असेल. या स्मारकाच्या कामाला राज्य सरकारने सहकार्य करावे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यावर्षीपासून अहिल्यादेवी अध्यासन सुरू करावे,’ अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

यावेळी आठवले, डांगे व पडळकर यांची भाषणे झाली. धनगर आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे पडळकर यांनी जाहीर केले. सुभेदार मल्हारराव होळकर यांचे स्मारक करण्याची मागणीही त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button