एलोपथीवरील वक्तव्य भोवलं, रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल
कोलकाता – एलोपथी उपचारांवर टीका करणाऱ्या योगगुरू रामदेव बाबांविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बंगाल शाखेने गुन्हा दाखल केला आहे. कोलकात्याच्या सिंथी पोलीस ठाण्यात बाबा रामदेव यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे. आयएमएचे बंगाल शाखेचे माजी अध्यक्ष आणि टीएमसीचे खासदार डॉ. शांतनू सेन यांनी हा एफआयआर दाखल केला आहे. आधुनिक उपचार पद्धती आणि अॅलोपॅथी कोरोनावर उपचार करू शकत नाही, असं रामदेव बाबा यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, असं सेन यांनी सांगितलं. याआधी आयएमएने रामदेव बाबांवर गुन्हा दाखल करण्याचा आणि मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.
रामदेव बाबा यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. आधुनिक औषधांनी कोरोना पीडितांचा मृत्यू होतोय असं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतरही दहा हजार डॉक्टरांचा मृत्यू झाल्याचं रामदेव बाबांनी म्हटलं आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा गंभीर गुन्हा आहे. रामदेव बाबा आधुनिक उपचार पद्धतीची बदनामी करत आहेत. एकीकडे डॉक्टर जीव मुठीत घेऊन रुग्णांना वाचवत आहेत. देशाची सेवा करणाऱ्या या डॉक्टरांचा सन्मान केला पाहिजे. मात्र रामदेव बाबा त्यांना बदनाम करत असल्यानेच गुन्हा दाखल केला आहे, असं सेन यांनी सांगितलं.
रामदेव बाबा काय म्हणाले होते?
यापूर्वी रामदेवबाबांनी व्हॉटसअॅपवर एक मेसेज करून अॅलोपॅथीवर टीका केली होती. आश्चर्यकारक तमाशा आहे. अॅलोपॅथी मूर्खपणाचं आणि दिवाळखोर विज्ञान आहे. आधी रेमडेसिवीर फेल ठरलं, नंतर अँटिबायोटिक्स फेल झालं, नंतर स्टेरॉईड फेल झाले, प्लाझ्मा थेरपीवरही बंदी घालण्यात आली, असं ते म्हणाले होते. तापावर दिलं जाणारं फॅबीफ्ल्यू देखील निकामी ठरलंय. जेवढे औषधं देत आहेत त्या सर्वांचं हेच होत आहे. त्यामुळे हा काय तमाशा सुरू आहे, असं जनता म्हणत आहे. त्यांची तापावरील कोणतीही औषधं काम करत नाहीये. कारण ते शरीराचं तापमान कमी करत आहेत. मात्र, ज्या विषाणूमुळे, बुरशीमुळे ताप येत आहे त्याचा यांच्याकडे इलाज नाही. तर मग हे कसे बरे करणार?, असा सवालही त्यांनी केला होता.