पाकिस्तानच्या उत्तरेकडील सियालकोट शहरातील लष्करी तळावर आग लागून स्फोट;
![A fire at a military base in the northern Pakistani city of Sialkot;](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/pakisan-sialcoat.png)
इस्लामाबाद | पाकिस्तानच्या उत्तरेकडील सियालकोट शहरातील लष्करी तळावर आग लागून स्फोट झाल्याची धक्कादायक घटना आज रविवारी सकाळी धडली. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, पंजाब प्रांतातील कॅन्टोन्मेंट परिसरापर्यंत तो ऐकू गेला. तसेच या स्फोटानंतर एकामागून एक छोटे आणि मोठे स्फोट झाले. धुराचे लोण संपुर्ण परिसरात पसरले होते.
या लष्करी तळावर दारुगोळा ठेवण्यात येतो. तेथे आज आग लागल्याने स्फोट झाला. सुरुवातीला एक स्फोट झाल्यानंतर लागोपाठ स्फोटांची मालिकाच सुरु झाली. त्यामुळे आजूबाजूचा परिसर हादरुन गेला. तेथील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नसून पाकिस्तानी लष्कराने या स्फोटाची पुष्टी केली आहे. मात्र ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घटना हे स्पष्ट झालेले नाही.
सियालकोटमध्ये पाकिस्तान लष्कराचे मोठे तळ आहे. सियालकोट कँट क्षेत्र हा पाकिस्तानमधील सर्वात जुने आणि महत्त्वाचे छावणी क्षेत्र आहे. 1852 मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मीने त्याची स्थापना केली होती.