उत्तर प्रदेशात मृतदेह जाळण्यासाठी पेट्रोल, टायर वापरल्याने ५ पोलीस निलंबित
![5 policemen suspended for using petrol, tires to cremate bodies in Uttar Pradesh](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/up-police.jpg)
उत्तर प्रदेश |
देशात करोनाचा संकट इतकं गडद झालं आहे की, रोजच मृतांचा आकडा नकोसा विक्रम प्रस्थापित करत आहे. त्यामुळे मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनासमोर अडचणी येत आहेत. नदी किनारी मृतदेह पुरल्याचेही अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यात उत्तर प्रदेशात गंगेत मृतदेह आढळल्याने विरोधकांनी योगी सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत. आता उत्तर प्रदेशातून मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात अंत्यसंस्कारासाठी पेट्रोल आणि टायरचा वापर करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर उत्तर प्रदेश सरकारने पाच पोलिसांना निलंबित केलं आहे. उत्तर प्रदेशमधील बलिया येथील घाटावर एक व्यक्ती मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी टायर आणि पेट्रोलचा वापर करत होता. यावेळी पोलीस तिथे उपस्थित होते.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नदी किनारी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे नदी प्रदूषित होणयाची भीती आहे. मात्र सूचना देऊनही पोलीस नदी किनारी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या व्हिडिओची गंभीर दखल घेत ५ पोलिसांना निलंबित केलं आहे. प्रशासनानं याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतदेहांवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करावे असे आदेश देण्यात आले आहेत. देशात गेल्या २४ तासात २,६३,५३३ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर ४,२२,४३६ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एका दिवसात ४,३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २,५२,२८,९९६ करोना रुग्ण आढळले आहेत. तर २,१५,९६,५१२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे. आतापर्यंत देशात एकूण २,७८,७१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या भारतात ३३,५३,७६५ बाधित करोना रुग्ण आहेत.