पोलिसांची मोठी कारवाई… धुळ्यानंतर आता नांदेडमध्ये २५ तलवारी जप्त, एकाला अटक
नांदेड |
धुळ्यात पोलिसांनी कारवाई करत गुरुवारी ९० तलवारी जप्त ( Nanded Police Seized 25 Swords ) केल्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आज नांदेडमध्ये पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईत २५ तलवारी जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी छापा मारत एका रिक्षेतून या २५ तलवारी जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
रिक्षातून या तलवारी नेण्यात येत होत्या. या सर्व २५ तलवारी नांदेड पोलिसांनी जप्त केल्या. एका आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केलीय. शहरातील गोकुळनगर भागातून रिक्षेतून शस्त्रसाठा नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाईत करत रिक्षेचे तपासणी केली. तेव्हा ऑटोरिक्षामध्ये २५ तलवारी आढळून आल्या.
पोलिसांनी या प्रकरणी आकाश गोटकवाड याला ताब्यात घेतले आहे. विक्रीच्या उद्देशाने तलवारी आणल्याची कबुली त्याने दिली आहे. पंजाबच्या अमृतसर येथून रेल्वेत पार्सल करून तलवारी नांदेडला आणल्याचे आरोपीने सांगितले. यात आणखी कोण-कोण सहभागी आहेत? याचा तपास पोलीस करत आहेत.