Balasore Train Accident : बालासोर रेल्वे अपघातात २३८ प्रवाशांचा मृत्यू, ९०० हून अधिक जखमी
Balasore Train Accident : ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी कोरोमंडल एक्सप्रेस आणि बंगळुरु-हावडा एक्स्प्रेस रुळावरुन घसरल्यानंतर मालगाडीला धडकल्या. या भीषण अपघातानंतर रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतला आहे. या मार्गावरुन धावणाऱ्या १८ एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. काही गाड्या अंशत रद्द करण्यात आल्या आहेत.
बालासोर येथे झालेल्या भीषण अपघातामुळे २३८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, जखमींचा आकडा ९०० वर पोहोचला आहे. शुक्रवारी (२ जून) सायंकाळी सातच्या दरम्यान हा भीषण अपघात घडला. या भीषण अपघातामुळे ओडिशामध्ये एक दिवसीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : संजय राऊतांचे माध्यमासमोर थुंकणे वादात
राज्यात आज कोणत्याही प्रकारचा राज्य उत्सव साजरा वा कार्यक्रम होणार नसल्याचेही राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाहीर केले. तसंच,केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी या अपघातप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
या घटनेची माहिती रेल्वे मंत्रालयात पोहोचल्याच क्षणी लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले. तसेच अपघातातल्या मृतांच्या कुटुंबीयांना १२ लाखांची मदत जाहीर झाली आहे. पंतप्रधान कार्यालय आणि रेल्वे मंत्रालयाने ही घोषणा केली आहे.