17 दिवसांत दुप्पट होताहेत रुग्ण, ऑगस्टपर्यंत अमेरिकेपेक्षा जास्त रुग्ण होतील…
![Mahaenews](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Covid-19.jpg)
नवी दिल्ली | भारत कोरोनामुळे जगातील चौथा सर्वाधिक संक्रमित देश ठरला आहे. आतापर्यंत या यादीत भारत सहाव्या स्थानावर होता. परंतु मागील काही दिवसांत देशात संक्रमितांच्या संख्या झपाट्याने वाढली. यामुले एका दिवसात भारत स्पेन आणि युकेला मागे टाकत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे.
बुधवारपर्यंत युके चौथ्या आणि स्पेन पाचव्या क्रमांकावर होता. भारतापुढे आता फक्त अमेरिका, रशिया आणि ब्राझील हे तीन देश आहेत. आपल्याकडे जर अशाच गतीने कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर 25 ते 30 ऑगस्टपर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक संक्रमित देश होईल.
तोपर्यंत ब्राझीलमध्ये यापेक्षा गंभीर परिस्थिती होईल. ब्राझीलमध्ये सध्याच्या गतीने रुग्णसंख्या वाढत राहिली तर 25 जुलै पर्यंत अमेरिकेला मागे टाकत कोरोना प्रभावित देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचेल.
डबलिंग रेटमध्ये ब्राझील अव्वल आहे. येथे 16 दिवसांत संक्रमितांची संख्या दुप्पट होत आहे. रुग्णसंख्या वाढीचा वेग असाच राहिला तर पुढील 64 दिवसांत अर्थात 14 ऑगस्टपर्यंत येथील संक्रमितांची संख्या एक कोटीपेक्षा जास्त होईल. भारताचा डबलिंग रेट 17 दिवसाचा आहे. येथील संक्रमितांची संख्या 17 दिवसांत दुप्पट होत आहे. हाच वेग राहिला तर 102 दिवस 21 सप्टेंबरपर्यंत भारतातील संक्रमितांची संख्या 1 कोटी पार होऊ शकते. स्पेनचा सर्वात कमी डबलिंग रेट आहे. येथे 1 कोटींचा आकडा होण्यास 408 दिवस लागतील.
कोरोना प्रभावित टॉप 6 देशांमध्ये भारताचा ग्रोथ रेट सर्वाधिक आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 4.30% दराने वाढत आहे. ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर असून तेथे 4.26% ग्रोथ रेट आहे. ही आकडेवारी जागतिक आरोग्य संगठनाची आहे. जगात सर्वात कमी ग्रोथ रेट स्पेनचा आहे. येथील संक्रमितांची संख्या 0.10% दराने वाढत आहे.