देशात गेल्या 24 तासात 16 हजार 51 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
![6915 new patients, 180 deaths in the last 24 hours in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/corona-4.jpg)
नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. देशातील कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत आहे. गेल्या 24 तासात देशात 16 हजार 51 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 206 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या दिवसाच्या तुलनेत आजची रुग्णसंख्या ही कमी आहे. काल देशभरात 19 हजार 968 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान, गेल्या 24 तासात देशात 37 हजार 901 कोरोनातून बरे झाले आहेत.
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 4 कोटी 28 लाख 38 हजार 524 लोकांना लागण झाली आहे. त्यापैकी 5 लाख 12 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 4 कोटी 21 लाख 24 हजार लोक कोरोनातून बरे झाले आहेत. सद्या देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांपेक्षा कमी आहे. सध्या एकूण 2 लाख 2 हजार 131 रुग्णांवर उपचार सुरूच आहेत.
कोरोनाची आत्तापर्यंतची स्थिती
कोरोनाची एकूण प्रकरणे – 4 कोटी 28 लाख 38 हजार 524
बरे झालेल्या रुग्णांची संख्या – 4 कोटी 21 लाख 24 हजार 284
एकूण सक्रिय प्रकरणे – 2 लाख 2 हजार 131
एकूण मृत्यू – 5 लाख 12 हजार 109
एकूण लसीकरण – 175 कोटी 46 लाख 25 हजार डोस देण्यात आले
सध्या देशात लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. ज्या नागरिकांना अद्याप लस घेतली नाही अशांना लसीकरण करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. कालच्या दिवसभरात एकूण 7 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, आत्तपर्यंत एकूण 175 कोटी 46 लाख 25 हजार लसीचे डोस देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचा विचार केला तर तिथेही रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्यामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूरसह मोठ्या शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. काही जिल्ह्यात रविवारी एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 1 हजार 437 नवे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी राज्यात एक हजार 635 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरली आहे. कारण मुंबई, पुणे जिल्हा, पुणे मनपा आणि अहमदनगर वगळता कोणत्याही जिल्ह्यात तीन आकडी रुग्णसंख्या नाही.