सर्वोच्च न्यायालयातील १० न्यायाधीश, ४०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
![The Supreme Court is ready to hear the petitions of 10th and 12th class students](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/suprim-court-1.jpg)
नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयातील १० न्यायाधीश आणि ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ३२ न्यायाधीशांपैकी १० न्यायाधीश आणि सुमारे ३००० कर्मचाऱ्यांपैकी ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांना व्हायरसची लागण झाली आहे.
२जानेवारी रोजी,सर्वोच्च न्यायालयाने संक्रमणाची वाढती संख्या लक्षात घेता ३ जानेवारीपासून दोन आठवड्यांसाठी सर्व सुनावणी डिजिटल पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, अवघ्या ९ दिवसांत बाधित न्यायाधीशांची संख्या दुप्पट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन न्यायाधीश बरे झाले आहेत, तर ८ न्यायाधीश अद्याप रजेवर आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांचा सकारात्मकता दरही ३० टक्क्यांवर गेला आहे. हलकी लक्षणे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर संसर्ग वाढलेल्या कर्मचाऱ्यांना हॉस्पलिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाच्या आवारात कोविड-१९तपासणी सुविधा स्थापन करण्यात आली आहे आणि ती सोमवार ते शनिवारपर्यंत सुरू राहते. एका परिपत्रकात म्हटले होते की, “कोरोनाच्या संसर्गजन्य रोखणे आणि त्याच्या प्रकरणांमध्ये अचानक झालेली वाढ लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात प्रवेश करणार्यांना, म्हणजे रजिस्ट्री कर्मचारी, समन्वय संस्थांचे कर्मचारी, अधिवक्ता आणि त्यांचे कर्मचारी इत्यादी, विशेषत: ज्यांना कोविड-१९ संसर्गाबाबत सूचित केल्याप्रमाणे लक्षणे आहेत, त्यांनी कृपया या सुविधेवर स्वतःची चाचणी करून घ्यावी,असे सांगण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांना होम आयसोलेशनचा पर्याय देण्यात आला आहे. आतापर्यंत उपचार घेतलेल्या न्यायाधीशांमध्ये एम जोसेफ आणि पीएस नरसिंहा हे कोरोनातून बरे होऊन कामाला लागले आहेत, अशी माहिती आहे.डॉ श्यामा गुप्ता यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारची आरोग्य सेवेची चिकित्सा टीम कोरोनाचा संसर्ग झालेल्या न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी २४ तास कार्यरत आहे. ही टीम दैनंदिन पातळीवर १०० ते २०० आरटीपीसीआर चाचण्या करत आहे. या चाचण्यांमध्ये संसर्गाचा धोका हा ३० टक्के धोक्याच्या पातळीचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. सर्वोच्च न्यायलयात सध्या अनेक महत्वपूर्ण प्रकरणे आहेत, ज्या प्रकरणावर न्यायालयाकडून निकाल येणे अपेक्षित असल्याचेही समजते. .