हाथरस घटनेच्या निषेधार्थ 26 ऑक्टोबरला काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Congress-.jpg)
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आणि नव्या कृषि विधेयकाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. 26 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे हे आंदोलन असणार आहे. तसेच, पक्षाच्या जिल्हा मुख्यलयाच्या ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ 31 ऑक्टोबर रोजी आंदोलन केले जाणार आहे .यासंदर्भात काँग्रेसचे महासचिव के.सी.वेणूगोपाल यांनी सर्व राज्याच्या पक्ष कार्यालयांना लेखी निर्देश दिले आहेत. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा सध्या सीबीआयकडून तपास सुरू आहे. शनिवारी सीबीआयच्या पथकाने पुन्हा एकदा पीडितीचे गावास भेट दिली व पीडित कुटुंबाची चौकशी केली व घटनास्थळाची पाहणी केली.
या घटनेवरून काँग्रेस अधिकच आक्रमक झाली आहे. राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत, त्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असे म्हटले होते. तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील यावरून मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे. देशातील दलित बंधू-भगिनींवर अत्याचार होत आहेत. कायद्याचा सन्मान करण्या ऐवजी, मुलींना सुरक्षा देण्या ऐवजी भाजपा सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे.
पीडित कुटुंबांचा आवाज दाबला जात आहे. हा कोणता राजधर्म आहे? असा प्रश्न काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना केला आहे. देशाची लोकशाही कठीण काळातून जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान , 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे सत्याग्रह आणि उपवास करण्याचे निर्देश सर्व राज्य पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.