breaking-newsताज्या घडामोडी

हरिश्चंद्र गडावरील कोकणकड्यावरून कोसळून महाराष्ट्रातील सर्वात जुन्या ट्रेकरचा मृत्यू

नाशिक | महाईन्यूज

महाराष्ट्रातील सर्वात जुने, अनुभवी ट्रेकर अशी ख्याती असणाऱ्या अरुण सावंत (वय 60) यांचा शनिवारी सायंकाळी हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्यावरून कोसळून मृत्यू झाला. तीस जणांच्या चमुहासह कोकणकडा सर करायला गेलेल्या सावंत यांच्या आकस्मिक व अपघाती मृत्यूने गिर्यारोहण क्षेत्र सुन्न झाले आहे. बचाव पथकाने अथक प्रयत्न केल्यानंतर कड्यावरून कोसळलेल्या सावंत यांचा मृतदेह रविवारी दुपारी सापडलेला आहे.

सावंत यांच्या नेतृत्वाखाली तीस जणांचा चमू कोकणकड्याच्या चढाईसाठी प्रयत्नात होता. शनिवारी सायंकाळी सावंत स्वत: रॅपलिंगचे दोर लावण्याचे काम करत असताना, तोल जाऊन कोसळले अशी प्राथमिक माहिती आहे. सावंत यांनी आपल्या डोंगरांवरील भटकंतीची सुरवात 1975 पासून केली. 1980 मध्ये त्यांनी गिर्यारोहणाचा औपचारिक प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर गिरीविहार आणि हॉलिडे हायकर्सच्या माध्यमातून त्यांनी हिमालयातील अनेक शिखर मोहिमांमध्ये भाग घेतला. मात्र सह्याद्रीच्या प्रेमापोटी ते 84 सालापासून सह्याद्रीच्या मोहिमांवरच लक्ष केंद्रित केले.

लोणावळ्याच्या ड्यूक्स नोज (नागफणी सुळका) चढून जाणारे ते पहिले गिर्यारोहक होते. ही 800 फूटांची चढाई त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेणारी ठरली. सह्याद्रीतल्या सर्वाधिक लोकप्रिय ठरत असलेल्या ट्रेकिंगच्या जागा सांधण व्हॅली, कोकणकडा रॅपलिंग, थिटबी वाॅटरफाॅल रॅपलिंग सारख्या जागा शोधणारा अवलिया गिर्यारोहक अशीही त्यांची ओळख होती. गेली 40 वर्षे सह्याद्रीमध्ये प्रचंड भटकंती केलेला गिर्यारोहकाने सह्याद्रीवरच अखेरचा विसावा घेतल्याची भावना व्यक्त होत आहे. आजही सह्याद्रीतील अनेक वाटा, अनेक कड्यांवर सावंत यांनी केलेल्या बोल्टींगच्या आधारावरच गिर्यारोहक चढाई करत आहेत. 1986 मध्ये पडत्या पावसात सावंत यांनी कोकणकड्यावरून रॅपलिंग करत कड्याखाली कोसळलेल्या एका गिर्यारोहकाचा मृतदेह वाहून आणला होता. आज त्याच कोकणकड्यापाशी त्यांना चिरविश्रांती मिळालेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button